मारहाण, दमबाजी, दबाव आणण्याच्या विरोधात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: September 15, 2023 07:58 PM2023-09-15T19:58:56+5:302023-09-15T19:59:12+5:30
ठाणे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन या कृतीचा निषेध केला.
ठाणे : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य काम करून घेण्यासाठी दबाब आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांना मारहाण, दमबाजीला बळी पडावे लागले आहे. अशा मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टींपासून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या भा.दं.वि. ३५३ कायद्यामधील तरतुदी कमी करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहे. त्या कृतीविरुद्ध शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्यस्तरीय निषेध दिन पाळण्याचे आंदोलन छेडण्यात आले. त्यात ठाणे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन या कृतीचा निषेध केला.
महासंघाच्या आवाहनानुसार अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी या निवेदनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना दिली. यावेळी समितीचे सरचिटणीस जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, तहसिलदार संजय भोसले, नायब तहसिलदार स्मिता गुरव आदी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक शासकीय अधिकारी -कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो.
परंतु नियमात न बसणारी कामे नियमबाह्यपणे करून घेण्यासाठी शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांवर विविध क्षेत्रातील बड्या व्यक्तींकडून दबाव आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यात काही अधिकारी, कर्मचारी अनिच्छेने किंवा दबावाला बळी पडून, अशी कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करताना आढळतात. पण जे प्रामाणिकपणे आणि दबावाला बळी न पडता कामे करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नाहकपणे समाजाविघातक प्रवृत्तीं, व्यक्तींकडून मारहाण-दमबाजीला बळी पडावे लागते. या मनमानी विरोधात ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने निषेध दिन पाळून शासनाच्या कृतीचा निषेध केला आहे.