ठाण्यात राष्ट्रवादीने केला नथुरामी मानसिकतेचा निषेध, गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 02:08 PM2019-01-31T14:08:16+5:302019-01-31T14:08:34+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची काल पुण्यतिथी झाली. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणार्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली.
ठाणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची काल पुण्यतिथी झाली. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणार्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारून पुण्यतिथी साजरी केली. या घटनेचा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला असून महात्मा गांधी उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक मुकुंद केणी, मोरेश्वर किणे, जितेंद्र पाटील, मा. परिवहन सदस्य तक्की चेऊलकर, मा. शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी, फ्रंटल / सेल अध्यक्ष मोहसीन शेख, कैलास हावळे, राज राजापूरकर, प्रियंका सोनार, दीपक क्षत्रिय यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंद परांजपे यांनी, पूजा शकुन पांडे हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तिला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधीची 71 वी पुण्यतिथी होती. त्याअनुषंगानेच हिंदू महासभेने हा विकृत प्रकार केला होता. त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून धरणे आंदोलन करीत पुजा पांडे हिचा निषेध केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, भाजपाची सत्ता आणि सनातनवाद्यांची नीतिमत्ता या देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा मुखवटा घालत आहेत. मात्र, त्यांच्या हृदयात नथुरामच जीवंत आहे. मूहमे राम, बगलमे छुरी, असे या सरकारचे वर्तन आहे. त्यामुळे जर मोदी यांना खरोखरच राष्ट्रपिता महात्मा गांधींजीबद्दल प्रेम असेल , त्यांच्या विचारांवर निष्ठा असेल तर त्यांनी हिंदू महासभेवर तत्काळ बंदी घालून पुजा पांडे आणि तिच्या साथीदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.
तसेच गांधी हत्येच्या कटात तत्कालीन हिंदू महासभा सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. पुजा शकुन पांड्येच्या विकृतीमुळे तो खरा असल्याचेच सिद्ध होत आहे. त्यामुळे राष्ट्रपित्याच्या बाबतीत असे कृत्य करणार्या या विकृत मानसिकतेला मोकळे सोडणे म्हणजे हिंसेला प्राधान्य देण्यासारखेच आहे, असेही परांजपे म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष/कार्याध्यक्ष नितीन पाटील, शमीम खान, विजय भामरे, महेंद्र पवार, प्रकाश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सिल्वेस्टर डिसोझा, अरविंद मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.