जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने, राष्ट्रवादी अन् एबीव्हीपी भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:58 AM2021-12-13T11:58:35+5:302021-12-13T12:02:35+5:30
म्हाडातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून परीक्षार्थींना अडचणीत आणल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि अभिविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केली.
ठाणे : मविआ सरकारचा आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करुन जाब विचारण्यासाठी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभाविप कार्यकर्त्यांनी धिक्कार आंदोलन सुरू केले आहे. त्यावेळी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा जमवला आहे.
म्हाडातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून परीक्षार्थींना अडचणीत आणल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि अभिविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी, राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते जमा झाले. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपसात भिडल्याचे दिसून आले. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादी आणि अभाविपचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना उचलून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ पाहत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.