इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:49 AM2021-03-01T00:49:51+5:302021-03-01T00:49:57+5:30
गृहिणी मेटाकुटीस : दरवाढ कमी करण्यासाठी सरकारला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोलपंपाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रविवारी निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपासमोरच ही निदर्शने केली. यावेळी सुरेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलिंडरच्या दरात साधारणपणे शंभर रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे आता महिलांवर चूल पेटविण्याची वेळ आली आहे, पण ही दरवाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकारलाच आम्ही चुलीवर बसवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष फुलबानो पटेल, कळवा अध्यक्षा साबिया मेमन, प्रदेश प्रतिनिधी ज्योती निम्बर्गी, शशिकला पुजारी, कल्पना नार्वेकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भिवंडीत काढली सिलिंडरची प्रेतयात्रा
nभिवंडी : केंद्र शासनाच्या धाेरणामुळे घरगुती गॅससह पेट्रोल, डिझेलच्या इंधन दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे रविवारी आंदोलन करण्यात आले.
nकेंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भातील वंजारपट्टी नाका येथील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला लावलेल्या मोदींच्या जाहिरातीखालीच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे व कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गॅस दरवाढीचा निषेध म्हणून रिकाम्या गॅस बाॅटला तिरडीवर ठेवून प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली होती.
nत्याचबरोबर इंधन दरवाढीचा निषेध म्हणून हातगाडीवर मोटारसायकल तसेच चूल ठेवून राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध केला. केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत आहे. केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांचा व इंधन दरवाढीचा निषेध म्हणून रविवारी हे आंदोलन मोदींच्या बॅनरबाजीखाली केले आहे. देशातील जनतेच्या माथी मारलेली इंधन दरवाढ कमी केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिला आहे.