सर्व पक्षीयांकडून जोशी बेडेकर महाविद्यालयाबाहेर आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी
By अजित मांडके | Published: August 4, 2023 04:48 PM2023-08-04T16:48:34+5:302023-08-04T16:48:47+5:30
एकूणच एका मागून एक होणाऱ्या या आंदोलनामुळे महाविद्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
ठाणे - ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली वरीष्ठ एनसीसी कॅडेटकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारी देखील अधिक तीव्र स्वरुपात उमटल्याचे दिसून आले. ठाण्यातील सर्व पक्षीयांनी महाविद्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यात राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, कॉंग्रेस आणि मनसे देखील आघाडीवर असल्याचे दिसून आले. सकाळपासून एका मागोमाग एक आंदोलन झाले. त्यानंतर संबंधितावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरु असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते.
शुक्रवारी सकाळी सर्वात आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे ठाणे शहराध्यक्ष विरु वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला, तसेच मारहाण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, महाविद्यालय प्रशासनाने त्याच्या विरोधात एफआरआय नोंदवावा, तसेच कॉलेजच्या गेटला लॉक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न ठाणे नगर पोलिसांनी हाणून पाडला. याप्रसंगी माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या आदी उपस्थित होते.
त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने कॉलेजकडे धाव घेत आंदोलन केले. युवा - युवतीसेनेचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेऊन जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ १ चे गणेश गावडे यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई युवासेना कोर कमिटी यांनी सेंट्रल मैदान येथील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात भेट घेऊन थेट प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले.
त्यानंतर मनसेने देखील महाविद्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी मनसेचे शहर प्रमुख रवि मोरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील संबधीतावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली.
ठाणे शहर कॉंग्रेसेचे प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एन.एस.यु.आय या विद्यार्थ्यी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत, कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. एकूणच एका मागून एक होणाऱ्या या आंदोलनामुळे महाविद्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.