ठाण्यातील सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:42+5:302021-05-07T04:42:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील सर्व विकासकामे आणि स्मार्ट सिटीची कामे बाजूला ठेवून आंध्र प्रदेश सरकारने जाहीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील सर्व विकासकामे आणि स्मार्ट सिटीची कामे बाजूला ठेवून आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केल्याप्रमाणेच ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर ठाणे महापालिकेने मोफत उपचार करावेत, अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
मागील वर्षापासून कोविडच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. रुग्णांच्या जीवाचा खेळखंडोबा चालू आहे. साहित्य खरेदी, हाॅस्पिटल उभारणी, औषध खरेदी, जेवणाची व्यवस्था या सर्वच गोष्टींमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चालू असून यात महापालिकेतील अधिकारी व सत्तारूढ पक्ष सहभागी असल्याचा आरोप ठाणे शहराध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी करत या भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही केली. अन्यथा, काँग्रेसला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
कोरोना हा साथीचा रोग आहे. ब्रिटिशकाळात केलेल्या कायद्याद्वारे या साथीवर कसे नियंत्रण मिळवायचे, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या, याची संपूर्ण माहिती असताना तसेच एप्रिल २०१९ मध्ये हायकोर्टाचा निकाल असतानाही ठाण्यातील अनधिकृत, निकष न पूर्ण करणाऱ्या सर्व हाॅस्पिटल्सवर कारवाई अथवा ती बंद करण्यात आली नाहीत. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. आयुक्तांच्या बंगल्यावरील कामाकरिता उधळपट्टी कशाला, असा सवाल केला. वेेदान्त व प्राइम हाॅस्पिटल दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे म्हणाले की, लसीकरण वा इतर उपाययोजनांबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय गरजेचा आहे. आजही अनेक खाजगी हाॅस्पिटलमध्ये सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार बिले घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा हाॅस्पिटलवर काँग्रेसच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, सुखदेव घोलप, रमेश इंदिसे, गिरीश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.....
वाचली