‘पुरवणी मागणीत उल्लेख करून अनुदान द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:03+5:302021-03-20T04:40:03+5:30
भातसानगर : तुकड्यांच्या पुरवणी मागणीत उल्लेख करून मुंबई, कोल्हापूरमधील अनुदानपात्र उच्च माध्यमिक विद्यालयांच्या अनुदान वितरणाच्या सरकारी निर्णयात समावेश करण्याची ...
भातसानगर : तुकड्यांच्या पुरवणी मागणीत उल्लेख करून मुंबई, कोल्हापूरमधील अनुदानपात्र उच्च माध्यमिक विद्यालयांच्या अनुदान वितरणाच्या सरकारी निर्णयात समावेश करण्याची मागणी विनाअनुदान विरोधी संघर्ष उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
आज ना उद्या पगार मिळेल, या आशेने गेली २० वर्षे अविरतपणे शिक्षकी पेशात काम करणाऱ्या शिक्षकांना आता कुठे २० टक्के अनुदान जाहीर झाले. मात्र, हे अनुदान आजही मिळेल की नाही, अशी चिंता या शिक्षकांना वाटत आहे. कारण, केवळ मुंबई व कोल्हापूर या दोन विभागांना या प्रक्रियेतून वगळल्याचा उल्लेख संघटनेने केला आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांनी मुंबई, कोल्हापूर या विभागांतील शाळांना सापत्न वागणूक न देता तुकड्यांच्या पुरवणी मागणीत उल्लेख करून अनुदानपात्र उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण यांच्या अनुदान वितरणाच्या सरकारी निर्णयात समावेश करून निधीची तरतूद करण्याची मागणी विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय घोडविंदे, उपाध्यक्ष गुणवंत पाटील, सचिव हरेश खारीक यांनी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.