वडाळा-कासारवडवली-भिवंडी मेट्रो मार्गात मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:38+5:302021-07-10T04:27:38+5:30
ठाणे : मेट्रो चारच्या कामात तीनहातनाका ते कासारवडवलीपर्यंत कुठेही पार्किंगच्या सुविधेचा विचार झालेला नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, ...
ठाणे : मेट्रो चारच्या कामात तीनहातनाका ते कासारवडवलीपर्यंत कुठेही पार्किंगच्या सुविधेचा विचार झालेला नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, त्याची दखल घेऊन भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस विभागाकडून एमएमआरडीएला पत्र्यव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानुसार माजिवडा आणि कॅडबरी जंक्शन वगळता इतर थांब्याच्या ठिकाणी व्हर्टिकल तसेच मल्टिलेव्हल पार्किंगचा विचार करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच भिवंडीपर्यंतच्या मार्गातही हीच सुविधा देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
वडाळा ते कासारवडवली अशा मेट्रो चारचे काम सध्या ठाण्यात वेगाने सुरू आहे. ठाण्यातून ही मेट्रो तीनहातनाका मार्गे, कॅडबरी, ज्युपिटर रुग्णालय, माजिवडा, विद्यापीठ, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ करून पुढे कासारवडवली येथे जाणार आहे; परंतु ठाण्यात किंवा भिवंडीकडे जाणाऱ्या मेट्रोच्या ठिकाणी एकाही थांब्यावर पार्किंगचा कुठेही विचार झालेला दिसून आला नसल्याचे एमएमआरडीनेदेखील मान्य केले आहे.
यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीची बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार एमएमआरडीएला शुक्रवारी यासंदर्भात पत्रव्यवहार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. तीनहातनाका, नितीन कंपनी ते घोडबंदर आणि भिवंडीपर्यंत एकावर एक या पद्धतीने व्हर्टिकल व मल्टिलेव्हल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे या पत्रात नमूद केले आहे. यासाठी सर्व्हेदेखील करण्याच्या सूचना केल्या आहेत. व्हर्टिकल पार्किंगमुळे एकाच जागेवर कमी जागेत जास्तीची वाहने पार्क होऊन महत्त्वाच्या जंक्शनवरील वाहतूक कोंडीदेखील कमी होण्यास मदत होईल, असा दावा केला आहे. माजिवडा आणि कॅडबरी जंक्शनजवळ ज्युपीटर रुग्णालया शेजारी महापालिकेने पार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे हे दोन जंक्शन त्यातून वगळण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
.......
भविष्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमएमआरडीएला मेट्रोच्या थांब्यावरील पार्किंग धोरण जाहीर करावे, असे पत्र धाडण्यात आले आहे. त्यानुसार कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते, याचीही माहिती दिली आहे.
(बाळासाहेब पाटील - वाहतूक पोलीस उपायुक्त, ठाणे )