गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडा, आमदार प्रमोद पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:18 PM2020-07-26T15:18:53+5:302020-07-26T15:19:28+5:30
त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी अनेक प्रवासी संघटनांनी विनंती केली आहे. पण तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत.
डोंबिवली - कोकणातगणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासीगणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. राज्यातील नागरिकांना अन्य राज्यात सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक सह इतर रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी अनेक प्रवासी संघटनांनी विनंती केली आहे. पण तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. मात्र इतर राज्यात सुरू करण्यात आलेल्या गाड्यामधून लाखो नागरिक त्यांच्या राज्यात गेले व परत महाराष्ट्रातही आले. परंतु महाराष्ट्रातील जनतेला या गाड्यांचा काहीही फायदा झालेला नाही. किमान गणेशोत्सवासाठी तरी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी अशी सर्वांची माफक अपेक्षा असून त्यासंदर्भात एक पत्र आमदार प्रमोद पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल याना रविवारी पाठवले.
दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरू असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी कोरोना (COVID-19) विषाणू चे संकट संपूर्ण देशासह राज्यावर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही लॉकडाऊन सुरू असून जवळ जवळ चार महिन्यांपासून कंपन्या,व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. यामध्ये बहुतांश जणांचा रोजगार बुडाला असून,आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने अव्वा च्या सव्वा खाजगी ट्रॅव्हल ला भाडे देऊन गावी जावे लागत आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील नोकरदार हतबल झाला आहे.
आता गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चाकरमान्यांना गावी लवकर जाऊन, कॉरनटाईन व्हावे लागणार आहे. अशावेळी तातडीने रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तरी या अडचणीची तातडीने दखल घेऊन, कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी मुंबई सी.एस.टी, लो.टी.टं, ठाणे, वांद्रे टर्मिनस , कल्याण जं, वसई रेल्वे या स्थानकावरून रेल्वे सेवा ताबडतोब सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.