कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला ६० कोटींची तरतूद; एकनाथ शिंदेंची माहिती
By जितेंद्र कालेकर | Published: August 14, 2023 11:02 PM2023-08-14T23:02:31+5:302023-08-14T23:02:43+5:30
रुग्णाच्या नातेवाईकांनाही भरपाई दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले.
ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णाचे मृत्यू ही घटना दुर्दैवीच आहे. इथे शेकडो - हजारो पेशंट येतात, क्रीटीकल पेशंट बरे होवून घरीदेखील जातात. या घटनेच्या चौकशीमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. रुग्णाच्या नातेवाईकांनाही भरपाई दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले.
रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. विनाकारण कोणावरही कारवाई केली जाणार नाही, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे खचीकरण होणार नाही, हेही पहिले जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांनी या रुग्णालयातील कार्ड आणि अति दक्षता विभागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मी प्रत्यक्ष वॉर्डमध्ये पेशंटची परिस्थिती पाहिली. आयसीयुमध्ये योग्य सुविधा आहे. त्याआधी त्यांनी अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आनंद दिघे हार्ट केअरमध्ये ३५० रुग्ण उपचार घेतात. सिव्हील रुग्णालय बंद असल्यामुळे इकडे जास्त पेशंट येतात. काही लोकांना स्थलांतरीत सिव्हील रुग्णालय माहित नाही, त्याची तजवीज आयुक्तांनी केली आहे. ज्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याबाबत २५ ऑगस्ट पर्यंत अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे. सखोल चौकशी करून यावर कार्यवाही केली जाईल. रुग्णांसाठी चांगल्या सुविधा देण्यात येतील. महागडी इंजेक्शनदेखील रुग्णांना दिली जातात. रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. डॉक्टर आणि स्टाफ रुग्णांना वाचविण्याचं कसोशीने प्रयत्न करतात. डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण होता कामा नये. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
काही लोकांनी या रुग्णालयाबद्दल बदनामी केली त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. रुग्ण बरा होवून घरी जायला पाहिजे यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहे. सिव्हीलचे काम सुरु आहे पण मेंटल हॉस्पिटलमध्ये 300 बेड उपलब्ध आहे. इथून तिथे जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स सुविधा केलेली आहे. डॉक्टर येथे रुग्णांची काळजी घेत आहेत. इथेच उपचार करत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. मला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की आम्ही समाधान व्यक्त करतो. या रुग्ग्णालयाबाबत दिशाभूल व संभ्रम व्यक्त करू नये.
झालेल्या घटनेबाबत चौकशी करून जी काही मदत मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यात येईल. सिव्हीलमध्ये ३५० बेड आहे अजून १०० बेड वाढविण्यात येतील. कळवा रुग्णालयासाठी ६० कोटी मंजूर केले आहेत. शहापूर, इर्शाळवाडी, महालक्ष्मी, कोव्हीड, कोल्हापूर, महाड-चिपळूणला जाणारा एकनाथ शिंदे आहे. मी गावी माझ्या लोकांना भेटलो. त्यांच्याही समस्या सोडवत आहे. इथे काय घडलं त्यावर माझं लeक्ष आहे. स्वतःचे जीव वाचवून इतरांचा जीव वाचविणारा शिंदे आहे. इथे राजकारण करणं म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खान्यासारखं आहे. ते कोणी करू नये. मी इथे राजकारण करत नाही.,असं ही ते म्हणाले.