मुख्यमंत्र्यांविरुद्ध चिथावणीखोर बदनामीकारक वक्तव्य: नारायण राणेंविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:22 PM2021-08-24T22:22:43+5:302021-08-24T22:23:37+5:30
महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बदनामीकारक तसेच समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन चिथावणी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बदनामीकारक तसेच समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन चिथावणी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोरच राणे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महापौर म्हस्के यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २३ आॅगस्ट २०२१ रोजी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्टÑाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, अशी विधाने केली.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध बदनामीकारक आणि द्वेषभाव निर्माण करणारी विधाने केली. त्यामुळेच सोशल मिडिया, इलेक्ट्रीक मिडिया आणि वर्तमानपत्राद्वारे मुख्यमंत्री या घटनात्मक पदाच्या व प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तीमत्वाच्या लौकिकाला बाधा येईल. त्यांची बदनामी होईल, असे वक्त व्य केले. त्यामुळेच पक्षीय कार्यकर्त्यांमुळे ठाणे शहरात संघर्ष निर्माण होऊ शकतो. यात राणे यांचे वक्त व्यच कारणीभूत ठरु शकते. राणे यांच्या वक्त व्यामुळे राजशिष्टाचाराचाही अपमान झाल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२) आणि १५३- ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
* काय सांगते कलम ५००- एखाद्याची बदनामी करणे.
* कलम ५०५ (२)- वर्गावर्गात द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण किंवा वाढविणारे विधाने करणे
* कलम- १५३- बेछूटपणे, चिथावणीखोर वक्त व्य करुन दंगलीचा अपराध घडावा असा उद्देश. यात एक वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
२-शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण करणारे वक्तव्य करणे
* या कलमांद्वारे तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------
मंत्री पदाचे गाजर दाखवून भाजपने शिवसेनेवर भुंकणारा प्राणी पाळलेला आहे. अशा शब्दात नाव न घेता राणे यांच्यावर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी टीका करत निशाणा साधला आहे. यावेळी शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.