पाणीटंचाईबाबत जनजागृतीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:23+5:302021-03-27T04:41:23+5:30
मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच दर १५ दिवसांनी होणाऱ्या कपातीमुळे शहरात टंचाई भेडसावत ...
मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच दर १५ दिवसांनी होणाऱ्या कपातीमुळे शहरात टंचाई भेडसावत आहे. याबाबत जनजागृती करावी, अशी विनंती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नगरसेवकांना केली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून ९५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मंडळाकडून १२५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात ९ मार्चपासून ९५ दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. म्हणजेच ३० दशलक्ष लीटर पाणी कमी आहे. त्यातच पाण्याचे नियोजन व्हावे म्हणून पाटबंधारे विभागाने जानेवारीपासून १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे.
कपातीनंतर शहराचा पाणीपुरवठा ६० ते ७० तासांवर जातो. याशिवाय उदंचन केंद्रात वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड आणि कारणांनी तसेच शहर आधीच शेवटच्या टोकाला असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो. शहरातील नागरिकांना या सर्व परिस्थितीची माहिती मिळावी म्हणून प्रसिद्धिपत्रक काढून नगरसेवकांनी जनजागृती करण्याची गरज बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे.