मतदान वाढीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जनजागृती अभियान जिल्हाभर जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 08:50 PM2019-04-01T20:50:26+5:302019-04-01T20:55:42+5:30
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या.
ठाणे : जिल्ह्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची प्रत्येक्ष टक्केवारी वाढविण्यासाठी स्विप कार्यक्र मांतर्गत विविध उपक्र म होती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणेजिल्हा परिषदेची यंत्रणेने देखिल ग्रामीण भागात मतदान जनजागृती अभियान राबवूप मोठ्याप्रमाणात जागृती केली. यासाठी जिल्हाभर नेमणूक केलेल्या नोडल आॅफिसरची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनवणे यांच्यासह अतिरिक्त सीईओ ब.भि. नेमाने यांनी मतदान जनजागृतीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या. यामध्ये शिक्षण, महिला व बाल विकास, आरोग्य, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा आदींच्या अधिकाऱ्यांनी राबवलेल्या कामकाजाचे यावेळी सादरीकरण केले. या जनजागृती कार्यक्रमाच्या आराखड्याव्दारे अठरा वर्षावरील कॉलेज युवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि बचत गट महिलाच्या मदतीने विविध वयोगटातील नागरिकांना मतदान केंद्रावर जावून मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, जेष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे , अशा ठिकाणी जास्तीत जास्त जनजागृती करावी अशा सूचना सबंधित नोडल अधिकाºयांना आजच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे, सहाय्यक प्रकल्प संचालक एच. दोडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील, डॉ. कृपाली बांगर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.