‘प्लास्टिक बंदी’च्या तोंडावर जनजागृती
By admin | Published: July 17, 2017 01:04 AM2017-07-17T01:04:43+5:302017-07-17T01:04:43+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ जुलैपासून महापालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी अंमलात आणली. ती लागू होताना जाग
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ जुलैपासून महापालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी अंमलात आणली. ती लागू होताना जाग आल्यासारखी पालिकेने फलक लावून जागृती केली. पण कोणतेही नियोजन नसताना आणि पर्यायी व्यवस्था न करता लागू केलेल्या या बंदीबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीची घोषणा करण्यात आली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक आणि पत्रकारांचा समावेश असलेल्या समितीने कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्याचे आवाहन महापौरांनी केले.
प्लास्टिक मुक्तीत लोकसहभाग महत्वाचा असून लोकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. पालिका कल्याण व डोंबिवलीत प्लास्टिक कलेक्शन सेंटर उघडणार आहे. नागरिकांनी या सेंटरवर प्लास्टिक जमा करावे. लवकरच ओला व सुका कचरा वर्गीकरण करु न स्वीकारला जाणार आहे. त्याची सवय नागरिकांनी लावून घ्यावी. गणेशोत्सव काळात मंडळांनी कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त शहर संकल्पनेचे देखावे सादर करून जागृती करावी, असे आवाहन महापौरांनी केले. या व्यतिरिक्त प्रभाग स्तरावर आणि महापालिका नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन केली जाणार आहे. समितीची रचना त्रिस्तरीय असेल.