वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप न करता वर्षभर कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती सुरूच ठेवणार : डॉ विनयकुमार राठोड
By नितीन पंडित | Published: January 12, 2023 06:22 PM2023-01-12T18:22:40+5:302023-01-12T18:23:23+5:30
वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे .
भिवंडी - वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे, असे प्रतिपादन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी केले आहे. गुरुवारी ते नारपोली वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे,कल्याण नाका भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील,रांजनोली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांसह मोठ्या संख्येने रिक्षा चालक परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता हा कधी कोणामध्ये दुजाभाव करीत नाही.गरीब श्रीमंत,राजा किंवा रंक असा भेदभाव करीत नाही त्यामुळे रस्त्यावरील अपघात हे कोणाच्या तरी चुकीमुळे घडत असतात.त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करीत आपण छोट्या छोट्या चुका सुधारल्या तर अपघात टळू शकतात.त्यामुळे आपल्याला वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळच येणार नाही असे सांगत, वाहतूक संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून केला जात असल्याने सप्ताहचा समारोप न करता दर महिना दोन महिन्यांनी विविध विद्यालय, महाविद्यालय, सामाजिक संस्था गृहनिर्माण सोसायटी या ठिकाणी वाहतूक विभागाच्या माध्यमातून जनजागृती करून वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत नागरिकां मध्ये आव्हान करणार असल्याचे शेवटी डॉ विनायकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी नारपोली वाहतूक शाखे कडून वर्षभरात एक चौक एक समस्या हा उपक्रम हाती घेणार असून त्यातून वर्षभरात अंजुरफाटा ते कशेळी या रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वर्षभरात तब्बल २२ हजार जणांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड जमा केला असल्याची माहिती दिली.कार्यक्रमा दरम्यान वाहतूक विभागाला सहकार्य करणाऱ्या सरपंच राजेंद्र मढवी,राजेंद्र भोईर, प्रताप पाटील,पी के म्हात्रे,पप्पू खंडागळे, संतोष साळवी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील यांनी केले.