सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसांचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:56 AM2020-08-18T00:56:16+5:302020-08-18T00:56:26+5:30
कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या एकीकडे घटली असताना दुसरीकडे बहुतांश मंडळांकडून गणेशोत्सव केवळ दीड दिवसांचा साजरा केला जाणार आहे.
कल्याण : कोरोनामुळे यंदा सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरांतील २१२ मंडळांपैकी केवळ ९३ मंडळांनी मंडपउभारणीसाठी महापालिकेकडे परवानगी घेतली आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या एकीकडे घटली असताना दुसरीकडे बहुतांश मंडळांकडून गणेशोत्सव केवळ दीड दिवसांचा साजरा केला जाणार आहे.
सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. काही सण साजरे करण्यावर तर पूर्णपणे निर्बंध आल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सवही यंदा साधेपणाने साजरा होणार आहे. मनपा क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केडीएमसीकडूनही घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे आगमन आणि विसर्जन, यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा आल्या असून गर्दी टाळण्यासाठी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी तसेच साजºया होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आॅनलाइन सुविधांवर भर देण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीने सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आॅनलाइन बैठक ७ आॅगस्टला घेतली. यावेळी महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत २९१ मंडळांपैकी केवळ ११२ मंडळांनी सहभाग घेतला होता. मंडपउभारणीसाठीच्या परवानगीकरिता १२ आॅगस्टपर्यंत मंडळांकडून अर्ज मागवण्यात आले होते.
१० बाय १० फुटांचा मंडप असेल तर कोणतेही शुल्क केडीएमसीकडून आकारण्यात येणार नाही. मात्र, त्याच्यापेक्षा अधिक आकाराचा मंडप असेल पाच रुपये फूट याप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. यात ९३ मंडळांकडून परवानगी घेण्यात आली आहे. संबंधित मंडळांकडून यावर्षीचा गणेशोत्सव दहा, सहा, पाच आणि दीड दिवसांचा साजरा केला जाणार आहे. दीड दिवसांचा गणोशोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या यात अधिक असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली.