कल्याण-नगर रेल्वेसाठी जनआंदोलन, रेल्वे संघर्ष समितीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:54 AM2018-11-06T03:54:34+5:302018-11-06T03:57:00+5:30
कल्याण-मुरबाड -नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून जनतेच्या सहकार्याने जनआंदोलन उभारणार असून येथील नागरिकांनी तसा निर्धार केल्याची माहिती
मुरबाड - कल्याण-मुरबाड -नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून जनतेच्या सहकार्याने जनआंदोलन उभारणार असून येथील नागरिकांनी तसा निर्धार केल्याची माहिती कल्याण-मुरबाड रेल्वे संघर्ष समितीचे समन्वयक चेतनसिंह पवार यांनी दिली. मुरबाड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कल्याण ते नगर अशा रेल्वेमार्गाचे पहिले सर्वेक्षण १९५० मध्ये झाले होते. त्यानंतर १९७३, २००३ आणि २०१० मध्ये रेल्वे बजेटमध्ये या २५० किमीच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अंदाजित ७७२ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या रेल्वेमार्गाबाबत सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत.
हा लांब पल्ल्यांचा रेल्वेमार्ग झाल्यास घाटमाथ्यावरील शेतीमालाला मुंबईसारखी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल. येथील औद्योगिक क्षेत्रातील बंद पडलेले उद्योग, कारखाने यांना चालना मिळून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. शिवाय, येथील आरोग्ययंत्रणादेखील सुलभ होईल.
मुरबाडशेजारील शहापूर तालुक्यात रेल्वेमुळे अनेक मोठमोठ्या अभियांत्रिकी, मेडिकल, शैक्षणिक संस्था राहिल्याने येथील विकासात हातभार लागला आहे.
जनजागृतीसाठी दौरा
कल्याण-मुरबाड रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून रेल्वेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी समितीने तालुक्यातील आतापर्यंत ८२ गावांचा दौरा केला असून भविष्यात रेल्वेसाठी मेळावे घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.