नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालयाच्या जागेवर आता होणार सार्वजनिक पार्कींग प्लाझा
By अजित मांडके | Published: November 15, 2017 12:00 AM2017-11-15T00:00:00+5:302017-11-15T00:00:00+5:30
स्टेशन आणि नौपाडा भागातील रस्त्यावरील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी आता ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय तोडणार आहे. त्याठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे.
ठाणे - स्टेशन परिसर आणि नौपाडा परिसर हा अंत्यत गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी रस्ते वाढण्यासही संधी नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वाहने पार्क होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आता ठाणे महापालिकेने नौपाडा प्रभाग समिती कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार हे कार्यालय पर्यायी ठिकाणी हलवून शाहु मार्केटची इमारत जमिनदोस्त करुन त्याठिकाणी सार्वजनिक पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या ठिकाणी तब्बल २०० कारचे पार्कींग आणि असंख्य दुचाकींच्या पार्कींगची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच येथील गाळेधारकांचे तळ मजल्यावर पुनवर्सन करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे.
त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. शाहु मार्केटची इमारत १९८० च्या दरम्यान बांधण्यात आली असून ही इमारत सध्या जीर्ण झाली आहे. या इमारतीत नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, काही पुनर्वसन करण्यात आलेले गाळेधारक (पोळी भाजी विक्रेते) व ग्राहक पंचायतीचे गोडावून आहे. या इमारतीची पुढील बाजू उंचावर तर मागील बाजू खाली गेलेली आहे. त्यामुळे मागील बाजू तोडण्यात येणार असून तळ मजल्यावर येथील गाळेधाराकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक पार्कींग उभारल्यास त्यापासून ५०० मी. त्रिज्येच्या परिसरात हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, एम.जी. रोड, तिन हात नाका, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण कॉलनी आदी परिसर येतो. तसेच एक किमीच्या त्रिज्येत ठाणे स्टेशन परिसर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्कींग प्लाझा उभारल्यास त्याचा जुन्या ठाण्यातील बहुतांश भागांना लाभ होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. शिवाय स्टेशन परिसरातील रस्ते पार्कींग मुक्त होण्यास मदत होऊ शकते असा विश्वासही पालिकेला वाटत आहे. या ठिकाणाहून स्टेशनकडे जाण्यासाठी टीएमटी मिनी बस ठेवल्यास स्टेशन परिसरातील पार्कींगही कमी होण्यास मदत होणार आहे.
शाहु मार्केट इमारतीमधील प्रभाग समिती कार्यालय विष्णु नगर भागातील शाळा क्रमांक १९ चे इमारतीमध्ये हलविण्याचा पालिकेचा विचार आहे. ही इमारत सध्या बहुसंख्य प्रमाणात रिकामी आहे. तळ अधिक चार मजल्यांची ही इमारत असून तिला दोन जिने आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावर हॉल व कार्यालय असून, प्रत्येक मजल्यावर ८ वर्ग केले आहेत. यापैकी तळ मजला अधिक पहिला मजला प्रभाग कार्यालयास ठेवल्यास ८०० चौरस मीटर क्षेत्र प्रभाग कार्यालयाला उपलब्ध होणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास शिल्लक ५०० चौरस मीटर क्षेत्रातही बांधकाम करता येऊ शकणार आहे.
दरम्यान, शाहु मार्केटमध्ये सार्वजनिक पार्कींग व्यवस्था उपलब्ध झाल्यास येथे बेसमेंटमध्ये दुचाकींची पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. तर तळ मजल्यावर गाळेधारकांचे पुनर्वसन आणि पहिल्या आणि दुसºया मजल्यावर तब्बल २०० कारचे पार्कींग प्लाझा उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे जागा कमी असल्याने पहिल्या आणि दुसºया मजल्यावर कार पार्क करण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबरच्या महासभेत या संदर्भातील महत्वाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास स्टेशन परिसर पासून ते थेट तिनहात नाका, हरिनिवास सर्कल पर्यंत वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.