उल्हासनगरातील सार्वजनिक शौचालय दरवाजा व पाणीविना, पुनर्बांधणी होणार
By सदानंद नाईक | Published: February 27, 2024 07:42 PM2024-02-27T19:42:22+5:302024-02-27T19:43:23+5:30
कॅम्प नं-५, तानाजीनगर येथील सार्वजनिक शौचालय दरवाजा व पाणीविना असून धोकादायक झाले आहे.
उल्हासनगर: कॅम्प नं-५, तानाजीनगर येथील सार्वजनिक शौचालय दरवाजा व पाणीविना असून धोकादायक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी जीवितहानी होण्यापूर्वी शौचालय पुनर्बांधणीची मागणी केली आहे. उल्हासनगर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी काही वर्षांपूर्वी एमएमआरडीएने पुढाकार घेऊन दुमजली शौचालय बांधून महापालिकेला हस्तांतरण केली होती. शौचालयाची देखरेख ठेवण्यासाठी बहुतांश शौचालय सामाजिक संस्थेला चालविण्यास महापालिकेने दिली. तर काही शौचालयाची देखरेख महापालिका आरोग्य विभाग करते. त्यापैकी अनेक शौचालय नादुरुस्त व धोकादायक झाले आहेत.
कॅम्प नं-५ गणेशनगर व तानाजीनगर येथील शौचालय धोकादायक झाले असून दरवाजे व पाणीविना असलेल्या शौचालयाचा वापर स्थानिक नागरिक व महिला करीत आहेत. स्थानिक नागरिकांनी शौचालय पुनर्बांधणीसाठी आंदोलन करून पुनर्बांधणीची मागणी केली आहे. अखेर तानाजीनगर येथील शौचालयसाठी २५ लाखाचा निधी महापालिकेने मंजूर केला असून गणेशनगर येथील शौचालयाची पुनर्बांधणीच्या मागणीने उचल खाल्ली आहे.
कामगार नेते व स्थानिक नागरिक राधाकृष्ण साठे यांनी शौचालयाची बांधणी त्वरित झाली नाहीतर, पुढील दुर्घटनेच्या महापालिका जबाबदार राहणार असल्याचे सांगितले. महापालिका बांधकाम विभागाने तानाजीनगर येथील शौचालयाला निधी दिल्याचे सांगून गणेशनगर येथील शौचालयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.