ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 17, 2023 02:21 PM2023-05-17T14:21:23+5:302023-05-17T14:21:38+5:30

स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण 98 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे.

Public toilets in Thane city will be transformed | ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरात होत असलेले बदल हे दृश्यस्वरुपात नागरिकांना दिसू लागले आहेत. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. स्वच्छता व  सौंदर्यीकरण याबाबत शहराने कात टाकली असून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानातंर्गत्‍ स्वच्छ शौचालय अभियान देखील हाती घेण्यात आले आहे. या अभियानातंर्गत ठाणे शहरातील 821 सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून 15 जुलैपर्यत शौचालयांची सर्व कामे दृश्य स्वरुपात नागरिकांनी  दिसली पाहिजेत अशा पध्दतीने कामे पूर्ण  करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना आज झालेल्या बैठकीत दिले.

महानगरपालिका क्षेत्रातील 50 टक्क्‌यांपेक्षा जास्त लोकसंख्या  झोपडपट्टीमध्ये राहते. येथे राहणाऱ्या बहुतांश नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे अपरिहार्य असल्याने सदर शौचालयांची भौतिक स्थिती चांगली असणे आणि त्यांची स्वच्छता अत्युच्च दर्जाची असणे हे महानगरपालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे. झोपडपट्टीतील सर्व शौचालय सुस्थितीत व आवश्यक सेवासुविधांनी युक्त असली पाहिजेत, कुठल्याही नागरिकाला असुविधेचा सामना करावा लागणार नाही या दृष्टीकोनातून अस्तित्वातील शौचालयाचे नुतनीकरण व नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयाची कामे दर्जेदार पध्दतीने होतील यासाठी सर्व अभियंत्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच याकामी नियुक्त केलेल्या ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून नियोजित काम होते आहे की नाही यासाठी सातत्याने पाहणी करावी व या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करुन घेण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या. जर या कामात उणीवा आढळून आल्या, काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाचे मोजमाप करुन जर बिलासाठी सादर केल्याचे निदर्शनास आले तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी या बैठकीत दिला.

शौचालय हे आरोग्याशी निगडीत असल्याने शौचालय नियमितपणे स्वच्छ राखणे अत्यंत गरजेचे आहे. अस्तित्वातील व नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व शौचालयांचे ड्रेनेज योग्य पध्दतीने आहे का याची तपासणी करुन यामध्ये काही उणीवा असल्यास आवश्यक उपाययोजना तातडीने करणे, प्रत्येक शौचालयावर ओव्हरहेड पाण्याची टाकी व नळ संयोजन बसविण्यात यावे व सदर टाक्यांमध्ये नियमित पाणी असेल याची खबरदारी घ्यावी.

स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण 98 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. एकूण 821 शौचालयांच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव असून सदर कामाचे कार्यादेश निर्गमित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या  निधीतील प्रत्येक रुपया हा संपूर्णत: त्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे असा सूचक इशाराही श्री. बांगर यांनी या बैठकीत दिला.

शौचालयावर ओव्हरहेड टँक अत्यावश्यक

सदर कामांच्या माध्यमातून शहरातील सर्व शौचालयांच्यावर ओव्हरहेड पाण्याच्या टाकीची सुविधा केली जाणार असून सर्व शौचालयामध्ये नळाला पाणी येईल हे सुनिश्चित केले जाईल.  शौचालयात बसविण्यात येणारे टाईल्स, भांडे, दरवाजे, कडी कोयंडे हे चांगल्या प्रतीचे बसविण्यात यावे, काही ठिकाणी नादुरूस्त असल्यास त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. तसेच स्थापत्य कामे उत्कृष्ट दर्जाची होतील या दृष्टीने आताच सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शौचालयात आवश्यक रंगरंगोटी करुन शौचालयाच्या परिसरात सुशोभित झाडांच्या कुंड्या ठेवण्यात याव्यात. शौचालये ही नागरिकांना वापरण्यास योग्य राहतील तसेच महिलांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व शौचालये कायमस्वरुपी स्वच्छ व नीटनेटके राहतील अशा प्रकारे दैनंदिन निगा व देखभाल राखण्यात यावी.

स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत वॉटरप्लस मानांकन स्पर्धेत ठाणे महानगरपालिका सहभागी होत आहे. ठाणे शहराला वॉटरप्लस मानांकन प्राप्त होण्यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी उदा. 24 तास पाण्याच्या उपलब्धतेसाठी शौचालयांवर ओव्हरहेड टँक बसविणे, शौचालयात नळ असणे, कडी कोयंडे सुस्थितीत असणे, शौचालयात पुरेशा प्रमाणात उजेड तसेच विजेची व्यवस्था असणे, दिव्यांगांना वापरण्यायोग्य अशी शौचालयांची रचना आदी बाबी असणे आवश्यक आहे. यासाठी शौचालयाची दुरूस्ती किंवा नवीन शौचालय बांधताना त्यामध्ये उपरोक्त नमूद बाबींचा समावेश होईल याची दक्षता घ्यावी तसेच प्रत्येक शौचालयात वापरण्यात येणारी साधने ही गुणवत्तापूर्वक असलीच पाहिजे याचीही खबरदारी घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत दिला.

दृश्यस्वरुपातील बदल नागरिकांना दिसायला हवेत

शौचालयाकडे जाणारे रस्ते नीटनेटके, अतिक्रमणमुक्त व स्वच्छ राहतील याची विशेष काळजी घेतली जावी.   शौचालयाच्या बाहेर सुशोभित झाडांच्या कुंड्या ठेवाव्यात. कंत्राटदाराकडून ही सर्व कामे करुन शौचालयाची निगा व देखभाल नियमित राहिल याचीही दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच शौचालयात विदारक परिस्थती आढळून आल्यास किंवा याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई  करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आल्या.

15 जुलैपर्यंत शौचालयाची कामे पूर्ण व्हावीत

शौचालयांची कामे ही युद्धपातळीवर पूर्ण होणे अपेक्षित असून कोणत्याही परिस्थितीत 15 जुलैपर्यत सर्व कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. सदर बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले तसेच सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Web Title: Public toilets in Thane city will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे