ठाण्यातील सार्वजनिक शौचालय कात टाकणार, महापालिका करणार ७०० शौचालयांची दुरुस्ती
By अजित मांडके | Published: March 15, 2023 05:05 PM2023-03-15T17:05:07+5:302023-03-15T17:06:24+5:30
ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्याठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मात्र मागील काही वर्षात या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झाली आहे.
ठाणे : मुख्यमंत्र्याचे ठाणे बदलतेय या संकल्पनेअंतर्गत रस्ते दुरुस्ती बरोबर, स्वच्छता, सुशोभिकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असतांना आता सार्वजनिक शौचालयांची झालेली दयनीय अवस्था देखील बदलणार आहे. ठाणे महापालिकेने आता शहरातील ९०० शौचालयांचा सर्व्हे केला असून त्यानुसार त्यातील ७०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तब्बल ७३ कोटीहून अधिकचा निधी खर्ची केला जाणार आहे. याचे काम देखील आता येत्या महिना अखेर सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्याठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मात्र मागील काही वर्षात या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झाली आहे. कुठे कडी कोंयडा तुटलेल्या अवस्थेत असणे, पाणी नसणे, वीजेची व्यवस्था नसणे आदींसह इतर असुविधा दिसून येत आहेत. पंरतु आता येत्या काही दिवसात सार्वजनिक शौचालये कात टाकणार असल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांचा सर्व्हे केला असून त्या नुसार ९०० पैकी ७०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून त्यानंतर येत्या महिना अखेर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
असा उपलब्ध होणार निधी
शौचालयांच्या दुरुस्तीसाठी शासन २५ कोटी, महापालिकेच्या मागासवर्गीय निधीतून - १३ कोटी, अण्णाभाऊ साठे योजनेतून - ९.०५ कोटी, आणि नगरविकास विभागाकडून -२५ कोटी अशा स्वरुपात या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
अशी होणार दुरुस्ती
शहरातील ७०० शौचालयांपैकी काही शौचालयांची किरकोळ तर काही शौचालयांची मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाकी बसविणे, कडी कोंयडा बसविणे, वीजेची सुविधा आदींसह इतर कामे यात केली जाणार आहेत.
कंटेनर टॉयलेटची निर्मिती
महापालिकेच्या माध्यमातून कंटेनर टॉयलेटची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार वागळे इस्टेट रोड नं. २२ येथे पहिले कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे. याठिकाणी दोन मुतारी व तीन ते पाच सीट्स उपलब्ध असणार आहेत. त्यात विदेशी आणि देशी सीटसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरातील इतर महत्वाच्या ठिकाणी महामार्ग आदींसह इतर महत्वाच्या रस्त्यांवर देखील अशा स्वरुपाचे ७५ टॉयलेट उभारले जाणार आहेत. त्यानुसार एका टॉयलेटसाठी सुमारे २५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.