दिव्यात ३५ एकरांवर सार्वजनिक सुविधांचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:59 AM2018-02-08T02:59:26+5:302018-02-08T02:59:44+5:30
ठाण्याचे झपाट्याने विकसित होणारे उपनगर म्हणून दिवा परिसराकडे पाहिले जात आहे.
नारायण जाधव
ठाणे : ठाण्याचे झपाट्याने विकसित होणारे उपनगर म्हणून दिवा परिसराकडे पाहिले जात आहे. या परिसरात रस्ते, गटारे, पाणीपुरवठा या पायाभूत सुविधा पुरवल्यानंतर आता दिवा-आगासन विभागासाठी सार्वजनिक सुविधांचे मोठे जाळे उभारून तेथील अंधार दूर करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यानुसार, येथील भारतीय रेल्वे कल्याणकारी संघटनेसाठी राखीव असलेल्या १३.८७ हेक्टर अर्थात ३४.६७ एकर या इतक्या विस्तीर्ण भूखंडावर बसस्थानक, मार्केट, हॉस्पिटल, विभाग कार्यालय, अग्निशमन दल, पोलीस ठाणे, जलकुंभ आणि वाहनतळ यासारख्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात आरक्षणबदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने १५ एप्रिल २०१७ रोजी राज्याच्या नगरविकास विभागास पाठवला होता. त्यासंदर्भात इत्थंभूत अभ्यास करून पुणे येथील राज्याच्या नगररचना संचालकांनी मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेस या सार्वजनिक सुविधांचे हेजाळे उभारण्यास संमती दिली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेने खास दिवा परिसरासाठी प्रभाग समिती गठीत केली आहे. त्यानंतर, आता आगासन येथील सर्व्हे नंबर-५ ते १२, सर्व्हे नंबर-१७ ते २५ आणि १७२, १७४, १७५, १७६ व १८९ वरील १३.८७ हेक्टर जागेवर या सुविधा उभारण्यात येणार आहेत.
>भाजपास लगाम घालण्यासाठी शिवसेनेची खेळी
दिवा परिसरात अलीकडच्या काळात भाजपा हळूहळू वाढत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीतही भाजपाला येथून लक्षणीय मते मिळाली होती. हा परिसर विधानसभेच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात मोडतो. यामुळे येत्या निवडणुकीत येथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्यासमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागात पायाभूत सुविधांसह सार्वजनिक सुविधाही पुरवण्याकडे ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून आता आगासन परिसरात सार्वजनिक सुविधांचे जाळे उभारण्यात येणार आहे.
>कोपरी येथे मैदान : याशिवाय, कोपरी येथील खेळाच्या मैदानाची उणीव लक्षात घेऊन येथील सिटी सर्व्हे नंबर१०२४ या निवासी क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडापैकी १६०० मीटर या इतक्या भूखंडावर खेळाचे मैदान विकसित करण्यासही नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे कोपरीकरांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
>या १३.८७ हेक्टर जागेची विभागणी पुढीलप्रमाणे
पोलीस ठाणे १.५ हेक्टर
बसस्टॅण्ड ०.२५ हेक्टर
मार्केट ३.०१ हेक्टर
जलकुंभ १.०९ हेक्टर
विभाग कार्यालय २.४ हेक्टर
हॉस्पिटल २.४ हेक्टर
वाहनतळ ०.७५ हेक्टर
अग्निशमनतळ ०.७४ हेक्टर
१५ मीटर रोड १.६४ हेक्टर