बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा वारसा कोण पुढे नेणार याचे उत्तर जनताच देईल - राजन विचारे
By अजित मांडके | Published: August 26, 2022 01:55 PM2022-08-26T13:55:10+5:302022-08-26T14:00:09+5:30
Shivsena Rajan Vichare : कोण कोणाच्या हृदयात आहे हे आता येत्या निवडणुकीत जनताच दाखवेल, फोटो हे काल्पनिक असतात, फोटो मध्ये न राहता दिघे यांनी जनतेच्या हृदयात राज्य केलेले आहे असेही सांगितले
ठाणे - आनंद दिघे गेलेले नाहीत ते आजही आहेत, ते सर्व बघत आहेत, त्यामुळे येत्या काळात तेच याचे उत्तर देतील आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना शिक्षा देतील असा इशारा शिवसेना खासदार राजन विचारे यानी शिंदे गटाला दिला. तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेत आहे, हे आगामी निवडणुकीत जनताच दाखवेल असेही त्यांनी सांगितले.
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित त्यांनी आज शक्तिस्थळावर दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि हा इशारा दिला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर, अनिता बिर्जे आदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. दिघे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच आमच्या सारखा सर्व सामान्य कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचला आहे तो त्यांच्यामुळे असेही त्यांनी संगितले. दिघे हे चार अक्षरांसाठी शेवटपर्यंत जगले असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावर टीका केली.
कोण कोणाच्या हृदयात आहे हे आता येत्या निवडणुकीत जनताच दाखवेल, फोटो हे काल्पनिक असतात, फोटो मध्ये न राहता दिघे यांनी जनतेच्या हृदयात राज्य केलेले आहे असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेला पहिली सत्ता ही ठाण्याने दिलेली आहे आणि ठाणेकर हे सुज्ञ आहेत त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांना अभिवादन करण्यासाठी आता जे काही घडलेलं आहे जे काही झालेलं आहे ते कोणत्याही शिवसैनिकाला पटलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते उघड्या डोळ्यांनी लोक बघत आहेत त्यामुळे त्याचा हिसाब किताब ही जनताच करेल.