कल्याणमधील लोकगायक प्रल्हाद शिंदे स्मारक झाले मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:26 AM2018-04-09T03:26:20+5:302018-04-09T03:26:20+5:30

 मोठ्या व्यक्तींबद्दल आम्हाला काही वाटते म्हणून पुतळे, स्मारके उभी करतो, ही भावना मनातून आधी काढून टाका.

Publican of Prahlad Shinde, a public performer in Kalyan | कल्याणमधील लोकगायक प्रल्हाद शिंदे स्मारक झाले मद्यपींचा अड्डा

कल्याणमधील लोकगायक प्रल्हाद शिंदे स्मारक झाले मद्यपींचा अड्डा

googlenewsNext

कल्याण- मोठ्या व्यक्तींबद्दल आम्हाला काही वाटते म्हणून पुतळे, स्मारके उभी करतो, ही भावना मनातून आधी काढून टाका. कारण, त्यांची देखभाल करता येत नसेल, तर तुम्ही या व्यक्तींची थट्टा करता, हे लक्षात घ्या. मतांच्या राजकारणासाठी तर मुळीच अशा गोष्टींची गरज नाही. मनापासून प्रेम दाखव. बेगडी प्रेमाची गरज नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. बाळासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारण्यात यावे, असा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. प्रस्तावित स्मारकासाठी एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. येथील काळातलाव परिसरातील एक एकर भूखंडावर बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला २०१४ मध्ये प्रारंभ झाला. अन्य स्मारकांच्या उभारणीचा इतिहास पाहता बाळासाहेबांचे स्मारक हे अवघ्या दोन ते तीन वर्षांत उभे राहिले, ही निश्चितच गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. परंतु, ही तत्परता सत्ताधाऱ्यांना अन्य स्मारकांच्या बाबतीत दाखवता आलेली नाही, हे देखील तितकेच वास्तव आहे. अन्य स्मारकांचा आढावा घेतल्यावर अशी अनेक स्मारके असल्याचे दिसून आले. सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना कोणी ‘वाली’ नसल्याचे चित्र आहे. हे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक पाहताना प्रकर्षाने जाणवते. ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली... अशी शेकडो भक्तिगीते, भावगीते, कव्वाली, कोळीगीते गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटवणारी शिंदे यांची गाणी आजही मराठी रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. या लोकगायकाची २३ जून २००३ रोजी प्राणज्योत मालवली. प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव १६ जुलै २००४ ला मंजूर झाला. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी स्मारकाच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला. पाच त सहा किलोमीटर अंतरावरील कोळवली येथे उभारल्या जात असलेल्या या स्मारकाचे काम अपूर्ण आहे. तेथे सुरक्षा कर्मचारी तैनात नाही. तेथे शोभेची झाडे लावली होती. ती सुकू न गेली आहेत. त्याची जागा दारूच्या बाटल्या, सिगारेट-पानमसाल्याच्या पाकिटांनी घेतली आहे. तेथील विजेचे दिवे गायब झाले असून तेथे पक्ष्यांनी घरटी बनवली आहेत. शेडचा पत्राही तुटलेल्या अवस्थेत असून स्मारकाचा परिसर मद्यपी, धूम्रपान करणाºयांचा अड्डा बनला आहे.
आनंदीबार्इंचे
‘ते’ स्मारकही कागदावरच
कल्याणला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणाºया भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या बाबतीतही प्रशासनाची अनास्था दिसून येते. प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्याणच्या रहिवासी असलेल्या आनंदीबार्इंनी ११ मार्च १८८६ मध्ये एमडी ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केली. या त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महापालिका शिक्षण मंडळ सदस्य अनिल काकडे यांनी आनंदीबार्इंचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी केली. २००५ मध्ये तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या महासभेत डॉ. जोशी यांचे स्मारक रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात यावे, असा प्रशासनाकडून आलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबत, २००७ मध्ये निविदा काढण्यात आल्या, परंतु कार्यवाही पुढे झाली नाही. स्मारक उभारणीसंदर्भात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ दोनवेळा काकडे यांनी उपोषण केले होते. मार्च २०१५ मध्ये त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला होता. दरम्यान, तब्बल ११ वर्षांनी का होईना सत्ताधाºयांना भूमिपूजनासाठी मुहूर्त मिळाला, परंतु आजतागायत हे स्मारक उभे राहिलेले नाही.
फुलेंच्या स्मारकाला भिकाºयांचा विळखा
कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून कल्याण शहर वेगळी ओळख निर्माण करत आहे. परंतु, स्मारकांच्या दुर्दशेक डे मात्र प्रशासनाने पुरता कानाडोळा केला आहे, याची प्रचीती कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील महात्मा जोतिबा फुलेंचे स्मारक पाहता येते. कल्याणच्या श्री सावता माळी मंडळ या संस्थेने जोतिबा फुलेंचा अर्धाकृती पुतळा १९६३ मध्ये उभारून कल्याण नगरपालिकेच्या स्वाधीन केला. या अर्धपुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांच्या हस्ते झाले. या पुतळ्याची स्थापना १९७४ मध्ये नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव आहेर यांच्या हस्ते झाली. आजघडीला या स्मारकाच्या अवतीभोवती भिकारी, गर्दुल्ले, मद्यपी यांचा राबता मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्यांचे कपडे स्मारकाच्या ठिकाणीच लटकावून ठेवलेले असतात. तसेच खाल्लेल्या वस्तूंचे कागद आणि खरकटे तिथेच टाकतात. त्यामुळे स्मारकाभोवती अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य असते. स्थानक परिसरात सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे कामानिमित्त येणाºया वाहनचालकांकडून त्यांची वाहने स्मारकाच्या भोवतीच सर्रास उभी केली जातात.
अध्यादेशामुळे
पुतळ्यांचे फेरप्रस्ताव
महासभेत मंजुरी दिलेले महापुरुषांचे पुतळे उभारण्यास दिरंगाई होत असताना सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे प्रस्तावित पुतळ्यांच्या प्रस्तावांना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागली. मार्च महिन्यात झालेल्या महासभेत डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यासह दोन ठिकाणी उभारण्यात येणाºया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे फेरप्रस्तावसादर करण्यात आले. पुन्हा नव्याने मंजुरी घेतली असली, तरी हे पुतळे उभारणीचे काम तत्परतेने पूर्णत्वाला येईल का, याबाबत मात्र साशंकता आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात उभारण्यात येणाºया डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या अर्धाकृती आणि महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आणि कल्याण पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाºया पूर्णाकृती पुतळ्यांचे काम प्रस्तावित आहे. डोंबिवलीत उभारण्यात येणाºया पुतळ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा साकारणाºया शिल्पकाराकडूनच डोंबिवलीचे काम पूर्ण झाल्यावर ड प्रभागातील पुतळ्याचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, अध्यादेशानुसार पुतळा उभारणीचे ठराव आणि हरकत प्रमाणपत्र एक वर्षापेक्षा अधिक जुने असू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर कसा पडला? : कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. पण, यासंदर्भात झालेल्या ठरावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळादेखील उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. मग, छत्रपतींचा विसर कसा काय पडला, असा सवाल शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे यांनी महासभेत उपस्थित केला होता. ठरावाप्रमाणे दोन्ही महापुरुषांचे पुतळे उभारणे गरजेचे असून जर निधी कमी पडला, तर आम्ही नगरसेवक तो देऊ, आवश्यक वाटल्यास आमदार जगन्नाथ शिंदे यांचा आमदार निधीही या कामासाठी उपलब्ध करून देऊ, असे शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी माजी नगरसेवक उदय रसाळ, सचिन पोटे यांनी मांडलेल्या शक्तिभक्ती स्मारकासंदर्भात केलेल्या प्रस्तावाची आठवण करून दिली. यावर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास एकमताने मान्यता देण्यात आली आहे.
घाईघाईत उद््घाटन
पालिका निवडणुकीआधी श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून घाईघाईत अर्धवट स्थितीतील स्मारकाचे लोकार्पण करून या लोकगायकाच्या स्मारकाची थट्टा केली. तेथे शिंदे यांचा पुतळा उभारून बाजूकडील संरक्षक भिंतींना रंगरंगोटी करून घाईत लोकार्पण उरकण्यात आले. तेथील उरलेली कामे आजघडीलादेखील झालेली नाहीत. या स्मारकाकडे सत्ताधाºयांचे पुरते दुर्लक्ष झाले असताना विरोधी पक्षही निद्रावस्थेत आहे.
शहीद स्मारकाची वाताहत
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्याच्या अनुषंगाने कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौकात शहीद स्मृती स्तंभ
उभारण्यात आला आहे. परंतु, या स्तंभाचीही पुरती वाताहत झाली आहे. धुळीने माखलेल्या या स्मारकाच्या ठिकाणच्या लाद्या तुटल्या आहेत. त्याच्या डागडुजीकडे पुरते
दुर्लक्ष झाले आहे.
साहित्य संमेलनाचे ते ‘शिल्प’ ही दुर्लक्षित
गेल्या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले कलामंदिराजवळ उभारण्यात आलेल्या शिल्पाकडेही केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. या शिल्पावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे आयोजक स्थानिक आगरी युथ फोरम असले, तरी हे संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यात केडीएमसीने मोलाचा वाटा उचलला होता. संमेलनाच्या निमित्ताने शहराच्या विविध भागांमध्ये फलकबाजी करताना आकर्षण म्हणून क्रीडासंकुलाला लागूनच असलेल्या मुख्य चौकात शिल्पही उभारण्यात आले होते. मात्र, संमेलन पार पडताच या शिल्पाकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. सद्य:स्थितीला हे शिल्प धुळीने माखले असून त्याच्याभोवताली थोड्याफार प्रमाणात गवतही वाढले आहे.
स्मारकाचा उद्देश सफल व्हावा
युगपुरुषांचे योगदान नागरिकांना ज्ञात होण्याच्या अनुषंगाने स्मारक आणि पुतळे उभे केले जातात. पण, नुसती स्मारके उभी राहता कामा नये. त्याठिकाणी युगपुरुषांच्या योगदानाचा आणि कार्याचा आढावा घेणारी माहिती देण्यात यावी. आर्ट गॅलरी तसेच म्युझियमच्या माध्यमातून हा प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामुळे त्याठिकाणी नागरिकांची वर्दळ कायम राहील. यामुळे स्मारक उभारण्याचा उद्देश सफल होईल, असे मत शिल्पकार स्वप्नील कदम यांनी मांडले.
सुरक्षा पुरवणे जिकिरीचे
सुरक्षा कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या पाहता सर्वच स्मारकांच्या ठिकाणी सुरक्षा पुरवणे जिकिरीचे झाले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, ज्याठिकाणी अतिआवश्यक आहे, त्याठिकाणी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. स्मारकांची दुरवस्था झाली आहे, असे म्हणता येणार नाही. प्रत्येक स्मारकाची नियमितपणे डागडुजी केली जाते, असा दावा केडीएमसीचे उद्यान निरीक्षक संजय जाधव यांनी केला.
ंपोलिसांचे बोट केडीएमसीकडे
केडीएमसीव्यतिरिक्त शहरात जे राजरोसपणे पुतळे उभे केले जातात, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची, याबाबत कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ज्याठिकाणी हे
पुतळे उभे राहतात, त्या जागा महापालिकेच्या असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
आरमाराचे स्मारक टाउनशिपमध्ये
आरमाराचा विसर पडलेला नाही. आम्ही आता टाउनशिपमध्ये ते उभारणार आहोत, अशी प्रतिक्रिया महापौर राजेंद्र देवळेकर यांनी देत त्यांनीही अधिक बोलण्यास नकार दिला.
टिळकही उपेक्षेचे धनी
लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणाºया सध्याच्या सत्ताधाºयांच्या काळातही टिळक आणि राजेंद्रप्रसाद रस्त्याच्या सांध्यावर उभा असलेला लोकमान्य बाळ गंगाधार टिळकांचा पुतळा उपेक्षित राहिला आहे. भर रस्त्यात असल्याने त्यावर सतत धुळीची पुटे चढलेली असतात. जयंती-पुण्यतिथीलाच तो पुतळा साफ करण्याचे काम होते. मध्यंतरी त्या भागातील काही संस्थांनी पुतळ््याच्या देखभालीची घोषणा केली. पण त्यातूनही पुढे काही साध्य झाले नाही. पुतळ््याची उपेक्षा कायम आहे.
म्हणे वर्षातून एकदा रंगरंगोटी होते
थोर पुरुषांचे पुतळे उभारणे चुकीचे नाही, पण त्यांचे पावित्र्य राखणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जयंती आणि पुण्यतिथीलाच स्मरण होणारे, हे पुतळे मग इतरवेळी विस्मृतीत जातात आणि दुरवस्थेच्या गर्तेत सापडतात. यावर अपुºया मनुष्यबळाचे कारण पुढे करत सुरक्षा पुरवू शकत नसल्याचे स्पष्टीकरण देताना वर्षातून एकदा तरी रंगरंगोटी केली जाते, असा दावा उद्यान विभागाकडून केला जात असला, तरी तो कितपत खरा किंवा खोटा, हे वस्तुस्थिती पाहता समोर येते. यातील अनेक पुळ््यांवर धुळीची पुटे चढलेली आहेत.
अश्वशिल्पही मोडकळीस
आयरे रस्त्यावरील दत्तनगर स्वामी विवेकानंद शाळेसमोर तिठ्यावर उभारलेले अश्वशिल्पही असेच मोडकळीस आले आहे. त्याचे कारंजे, दिवे कधी बंद पडले. आता तर शिल्पांवरच झुडपे उगवली आहेत.

Web Title: Publican of Prahlad Shinde, a public performer in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.