लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका या तीन खंडांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 04:22 PM2020-10-29T16:22:56+5:302020-10-29T16:23:05+5:30
लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक यांची विशेष उपस्थिती
ठाणे : लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका या तीन खंडांचे प्रकाशन लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या हस्ते वागळे इस्टेट येथील वास्तू रविराजच्या कार्यालयात झाले. ठाण्यातील परम मित्र प्रकाशनाने लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त या प्रकल्पाचे आयोजन केले आहे.
लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंड वर्ष १९२३, १९२५ आणि १९२७ साली प्रकाशित झाले होते. दैनिक केसरीत काम करणारे, लोकमान्य टिळक यांचे अनुयायी असलेल्या सदाशिव बापट यांनी त्यावेळी स्व-खर्चाने आणि विशेष परिश्रम आणि योजनेतून या तीन ग्रंथांची निर्मिती केली होती. या तीन खंडांना लोकमान्य टिळक यांचे सहकारी, ज्येष्ठ लेखक तात्यासाहेब केळकर यांची प्रस्तावना होती. तब्बल त्र्यांणव वर्षांनी या ग्रंथांची पुनर्निर्मिती परम मित्रने केली आहे. सुनिल कर्णिक यांनी या ग्रंथांचे संपादन केले आहे. ज्येष्ठ अभ्यासक, लेखक प्रा. सदानंद मोरे यांनी या तीन खंडांची प्रस्तावना लिहिली आहे. प्रत्येक खंड साधारण सहाशे पानांचा असून एकूण एकत्रित एक हजार आठशे पानांचा संदर्भपूर्ण दस्तावेज आहे. या तीन खंडाची मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार कै. गोपाळराव देऊस्कर तसेच, ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर आणि युवा चित्रकार उदय पळसुलेदेसाई यांच्या चित्रातून साकारली आहेत.
प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वास्तू रविराजचे संस्थापक डॉ. रविराज अहिरराव होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते अरुण करमरकर आणि सुप्रसिद्ध सनदी लेखापाल, संस्कृतचे अभ्यासक, रामायणाचे व्याख्याते चन्द्रशेखर वझे हे प्रमुख वक्ते होते. यावेळी व्यासपीठावर परम मित्र प्रकाशनाचे माधव जोशी उपस्थित होते.
प्रकाशनानिमित्त बोलताना शैलेश टिळक म्हणाले, आजच्या पिढीला लोकमान्य समजून घेण्यासाठी हे खंड उपयोगी ठरतील. या खंडाच्या निमित्त लोकमान्य टिळक यांचे अष्टावधानी व्यक्तिमत्व समजून घेणे अधिक सोपे जाईल. तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आणि त्याचे महत्व लक्षात येईल. लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त होणारा पहिला जाहीर कार्यक्रम आहे असे शैलेश टिळक यांनी सांगितले. प्रमुख वक्ते अरुण करमरकर यांनी त्यावेळी तात्यासाहेब केळकर यांची त्यावेळी लिहिलेली प्रस्तावना, तीन खंडांचे निर्माते सदाशिव बापट यांची भूमिका आणि लोकमान्य स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्रकाशित झालेल्या तीन खंडांना प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेली प्रस्तावना यावर भाष्य केले. चंद्रशेखर वझे यांनी समयोचित भाषण केले. प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रविराज अहिरराव यांनी हे खंड लोकमान्य यांच्या कार्य-कर्तृत्वाचा जागर करणारे आहेत असे नमूद केले. खंड संपादक सुनील कर्णिक, मुद्रक आनंद लिमये यांच्यासह तीन खंडांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा शैलेश टिळक यांच्या हसे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक परम मित्रचे माधव जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन महेश वैद्य यांनी केले.