ठाण्यात विकासाऐवजी व्यक्तींवर आधारित प्रचार

By admin | Published: February 20, 2017 04:31 AM2017-02-20T04:31:10+5:302017-02-20T04:31:10+5:30

आयारामांमुळेच चर्चेत आलेल्या ठाणे आणि उल्हासनगरच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली ती घरोघरच्या प्रचाराच्या मोहिमा सांभाळत आणि रविवारनिमित्त

Publicity based on Thane instead of development | ठाण्यात विकासाऐवजी व्यक्तींवर आधारित प्रचार

ठाण्यात विकासाऐवजी व्यक्तींवर आधारित प्रचार

Next

अजित मांडके, सदानंद नाईक / ठाणे, उल्हासनगर
आयारामांमुळेच चर्चेत आलेल्या ठाणे आणि उल्हासनगरच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली ती घरोघरच्या प्रचाराच्या मोहिमा सांभाळत आणि रविवारनिमित्त मतदारांना गाठण्यावर भर देत. ठाण्याच्या प्रचारात आयुक्त संजीव जयस्वाल हे केंद्रस्थानी राहिले, तर उल्हासनगरच्या प्रचारात वेगवेगळ्या अर्थाने चर्चा घडवली ती वादग्रस्त पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांनी. सर्वच पक्षांनी ठाण्यावर लक्ष केंद्रित केल्याने उल्हासनगरचा प्रचार काहीसा झाकोळला. प्रमुख नेत्यांनीही ठाण्यातच प्रचाराला सर्वाधिक पसंती दिली.
ठाण्यात १२ दिवस सुरू असलेल्या प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष दिसून आला. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याभोवती शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा धडाडल्या. मतदानासाठी पालिकेची तयारी पूर्ण झाली असून, मतदानाचा टक्का वाढवण्यावर दोन्ही पालिकांचे प्रयत्न सुरू आहेत.युती तुटल्याने प्रचारसभांमध्येही भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले, तर शिवसेनेने भाजपावर आगपाखड केल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीनेदेखील ‘२५ वर्षे सत्तेची, २५ वर्षे नाकर्तेपणाची’ म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या चार सभा ठाण्यात होणार होत्या. परंतु, केवळ एकच सभा झाली, तीही दिव्यात. तर, काँग्रेसतर्फे फक्त नारायण राणे आणि सचिन सावंत यांचीच सभा झाली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्यात सभा घेतली. दिवा दत्तक घेण्याची घोषणा करताना त्यांनी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूकठेवत त्यांना आम्हीच आणले आणि शहराचा विकास केला, असे सांगितले. त्यामुळे यानंतरचा प्रचार हा आयुक्तांच्या अवतीभोवती फिरताना दिसला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आयुक्तांवर निशाणा साधला.

९७ केंद्रे संवेदनशील
ठाण्यात यंदा ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी निवडणूक पार पडेल. यातील ३२ प्रभागांत ४ आणि प्रभाग क्रमांक २९मध्ये प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात आहेत. १३१ जागांसाठी २५ पक्षांमधून ८०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापालिका हद्दीत १,७०४ मतदान केंद्रे असून, त्यात ९७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. परंतु, अतिसंवेदनशील केंद्र एकही नाही. ठाण्यात १२ लाख २९ हजार २६६ मतदार असून, त्यात ६ लाख ६७ हजार ८६८ पुरुष, ५ लाख ६१ हजार ३८५ महिला मतदार आणि १५ इतर मतदार आहेत.

उल्हासनगरात ओमी कलानी रिंगणाबाहेर
ज्या ओमी कलानी यांच्या पक्षबदलामुळे दीर्घ काळ उल्हासनगरचे राजकारण ढवळून निघाले, ते ओमी मात्र निवडणूक लढवू शकलेले नाहीत. तीन अपत्यांच्या मुद्द्यावरून त्यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, त्यांचे बहुतांश समर्थक भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. उल्हासनगरला ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी काढलेल्या रॅली, मतदारांच्या गाठीभेटींनीच प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. प्रचारसमाप्तीनंतर लगोलग गुप्त बैठकांना सुरुवात झाली. अनेक प्रभागांतील वेगवेगळ्या पक्षांच्या रॅलीमध्ये आलटूनपालटून त्याच त्या महिला, पुरुष, मुले दिसत होती, ते त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उल्हासनगरात सर्व पक्षांनी घरोघर, गल्लीबोळांतील प्रचारावर भर दिला. सारे शहर कर्कश आवाज, घोषणांनी दुमदुमले. कडक उन्हातही प्रचाराचा जोर ओसरलेला नव्हता. वृद्ध तसेच महिला लहान मुलांना घेऊन प्रचार रॅलीत दिसत होत्या.

गुप्त बैठकांना जोर : प्रचारसमाप्तीनंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सोसायट्या, झोपडपट्टीतील कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळ, सामाजिक संस्था, मंदिरांचे विश्वस्त आदींच्या भेटीगाठी व गुप्त बैठका सुरू केल्या आहे.

मुख्यमंत्र्यांना उत्तर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत या दोघांनीच भ्रष्टाचार केल्याचा दावा करत प्रचारात रंगत आणली.

Web Title: Publicity based on Thane instead of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.