प्रकाशक, विक्रेते घामाघूम
By admin | Published: February 3, 2017 03:19 AM2017-02-03T03:19:31+5:302017-02-03T03:19:31+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पु.भा. भावे साहित्यनगरीत उभारलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी होणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळपासून
- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पु.भा. भावे साहित्यनगरीत उभारलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी होणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळपासून प्रकाशक, विक्रेते साहित्यनगरीत दाखल झाले. पुस्तके घेऊन आलेली वाहने थेट दालनापर्यंत न सोडल्याने प्रकाशक व विक्रेत्यांची हमाली वाढली. तसेच स्टॉलसाठी त्यांना दिलेली जागा कमी आहे. मात्र, त्यासाठी जादा भाडे आकारण्यात आले. पंखे नसल्याने ग्रंथदालनाची मांडणी करताना प्रकाशक व विक्रेते घामाघूम झाले.
पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात ग्रंथदालनापर्यंत पुस्तके नेण्यासाठी काही मुलांची व्यवस्था आयोजकांनी केली होती. मात्र, यंदा सोडत पद्धतीने स्टॉल्सचे वाटप झाल्याने कोणावरही अन्याय झाला नाही. ही समाधानकारक बाब आहे, असे प्रकाशक व वितरकांनी सांगितले. संमेलनाच्या मुख्य मंडपास लागून प्रथमच ग्रंथदालन उभारण्यात आले आहे. त्यात ३५० स्टॉल्स आहेत. १० बाय १२ आकारासाठी सहा हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जागा कमी मिळाली आहे. चार स्टॉल्सचे बुकिंग करणाऱ्यांना ३० चौरस फूट जागा कमी मिळाली आहे, अशी तक्रार प्रकाशक व वितरकांनी केली आहे. ग्रंथदालनापर्यंत वाहन नेण्याची मुभा नसल्याने पुस्तके उतरवून ती स्टॉलपर्यंत नेऊन ती मांडण्यासाठी प्रकाशकांना मोठी कसरत करावी लागली.
जनार्दन भुवड यांनी सांगितले की, तीन टेबल व तीन खुर्च्या आयोजकांनी दिल्या आहेत. पुस्तके ग्रंथदालनापर्यंत नेण्यासाठी हमाल करावे लागले. नाशिकच्या ज्योती बुक स्टोअरचे बाबू पाटील यांनी सांगितले की, या ठिकाणी पंखा हवा आहे. तर, हॅलोजन लावून ठेवला आहे. उकाड्यामुळे पुस्तके मांडताना आम्ही घामाघूम झालो आहोत.
ग्रंथदालनातील प्रकाशक व वितरकांच्या वास्तव्याची व्यवस्था आयोजकांनी बंदिस्त क्रीडागृह, ब्रह्मचैतन्य सभागृह आणि प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात केली आहे. मात्र, बंदिस्त सभागृह ग्रंथदालनाजवळच असल्याने वितरक व प्रकाशक त्याला अधिक पसंती आहे. बंदिस्त सभागृहात २०० जण, तर उर्वरित दोन ठिकाणी १५० जणांची व्यवस्था आहे.
पुस्तकमांडणीसाठी रॅक सोयीचे पडतात. काही प्रकाशक व विक्रेत्यांनी ते सोबत आणले आहेत. आयोजकांनी टेबल दिले आहेत. पुस्तकमांडणीसाठी ते सोयीचे नाही. पुस्तक प्रदर्शनासाठी जागा कमी असल्याने ३५० प्रकाशक व विक्रेत्यांची संख्या कमी आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी साहित्य महामंडळाने प्रकाशकांकडून देणगीची अपेक्षा केली आहे. मात्र, ती पूर्ण करणे तूर्तास तरी शक्य वाटत नाही.
- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा प्रकाशन
गाडी ग्रंथदालनापर्यंत जात नाही. आमचे चार स्टॉल्स आहेत. पुस्तके घेऊन येण्यासाठी आम्ही १० हमाल सोबत घेऊन आलो आहोत. आयोजक व महामंडळास प्रकाशक व विक्रेत्यांची किंमत नाही. ३ तारखेनंतर ग्रंथदालनाच्या जवळ गाडी सोडली जाणार नाही, असे नियमावलीत म्हटले होते. आता कार्पेट खराब होईल, या कारणास्तव गाडी ग्रंथदालनाजवळ सोडली जात नाही. त्यामुळे आमची परवड झाली आहे.
- उमेश पाटील, पाटील इंटरप्रायजेस.
स्टॉल्सचा आकार कमी आहे. त्या तुलनेत सहा हजार रुपये भाडे घेण्यात आले. पॅनलपद्धती असली तरी जागेअभावी पुस्तके मांडताना अडचणी येत आहेत. तसेच ऐच्छिक मदत निधीही देणे शक्य होणार नाही.
- सुनील मांडवे, संस्कृती प्रकाशन