विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर

By Admin | Published: December 28, 2015 02:26 AM2015-12-28T02:26:21+5:302015-12-28T02:26:21+5:30

चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘एकल जनसेवकां’चा सत्कार केला. त्यामुळे विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर करण्याचा योग आल्याने आजचा दिवस खऱ्या

Puja of various goddesses worshiped on one platform | विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर

विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘एकल जनसेवकां’चा सत्कार केला. त्यामुळे विविध देवीदेवतांची पूजा एकाच व्यासपीठावर करण्याचा योग आल्याने आजचा दिवस खऱ्या अर्थाने भाग्याचा आहे, अशी कृतज्ञता भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्थापक संचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
‘चतुरंग’च्या वतीने डोंबिवलीतील स.वा. जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी १० एकल जनसेवकांचा सन्मान सोहळा झाला. त्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जसा धार्मिक-कौटुंबिक वातावरणातून सार्वजनिक-समाजाभिमुख केला, महात्मा गांधीजींनी स्वच्छतेची महती विशद करत समाजाला त्याचे महत्त्व पटवून दिले, लालबहादूर शास्त्री यांनी सोमवारचा उपवास धरावा (आठवड्यातून एकदा) हा विचार समाजात आणला, जेणेकरून देशाच्या कानाकोपऱ्यांतील एका भुकेलेल्याला अन्न मिळेल, असे सामाजिक बांधीलकीचे उदात्तीकरण त्यातून प्रकट झाले. त्यांना मानाचा मुजरा तर आहेच, त्यांच्यासारखेच पण वेगळ्या धाटणीने काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचे काम ‘चतुरंग’ करत आहे. रेल्वे फलाटांमध्ये पळून आलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करणाऱ्या समतोल फाउंडेशनचे विजय जाधव, जास्तीतजास्त युवकांनी सैन्यात जावे, यासाठी अविरत कार्यरत असलेले मेजर गावंड, अनाथांना-बेवारसांना अंत्यसंस्कारापासून वंचित राहायला लागू नये, यासाठी झटणाऱ्या सुनीता पाटील, आध्यात्मिक प्रगतीसह धार्मिक, सांस्कृतिक रुढी-परंपरा टिकवण्यासाठी नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तांची तेथे गैरसोय होऊ नये, यासाठी झिजणाऱ्या प्रतिभा चितळे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शाळा चालवणारे नंदकुमार काटदरे, वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या मुस्काना मुजाबादी, कलाकारांना त्यांच्या अडीअडचणींत साथ देणाऱ्या पूनावाला, गेस्ट हाऊसचे चारूकाका सरपोतदार, अंधांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य करणारे राहुल देशमुख, बालकांमध्ये नाट्यासह अभिनयाची अभिरुची वाढीस लागावी यासाठी झटणाऱ्या कांचन सोनटक्के, समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. ममता लाला अशा एक से एक सामाजिक कार्य करणाऱ्यांना एकत्रित ज्यांनी केले, त्या ‘चतुरंग’च्या टीमचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे, असे गौरवोद्गार डॉ. सहस्रबुद्धे यांनी काढले.
समाजाचे एक प्रकारे स्वामित्व घेतलेल्या या मान्यवरांनी किंबहुना एकांड्या शिलेदारांनी कोणत्याही अपेक्षेने हे काम केलेले नाही. नि:स्वार्थ हेतूने काम करत राहणे, समाजासाठी झटत राहणे, हा एकच वसा-ध्यास या सर्वांनी घेतला आहे. त्यांना साथ हवी आहे, ती सतर्क आणि नोंद घेणाऱ्या नागरिकांची. डोंबिवलीकर अशा कामात कधीही मागे नाहीत, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या सर्वांना साथ द्या, जेणेकरून अशा पद्धतीचे सामाजिक काम वाढीस लागेल आणि खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जपली जाईल. अनेकांना आदर्श ठरावे, असे या सर्वांचे कार्य आहे. प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने असे काम केल्यास खऱ्या अर्थाने या सन्मानाला न्याय मिळेल.
याच निमित्ताने चतुरंगच्या २५ वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार ज्येष्ठ पंचागकर्ते- खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनीही त्यांच्या मनोगतात ज्यांचा सन्मान झाला, ते खऱ्या अर्थाने ‘व्रतस्थ’ होत, ते खरे मार्गस्थ होत, दिशादर्शक आहेत. जीवन कसे जगावे, हे त्यांना कळले हो, अशा शब्दांत सर्वांचा सन्मान केला.
याच निमित्ताने ज्यांचा सन्मान झाला, त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी ‘व्रतस्थ’ या पुस्तकाचे आणि चतुरंगच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Puja of various goddesses worshiped on one platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.