राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By अजित मांडके | Published: February 24, 2024 10:43 PM2024-02-24T22:43:14+5:302024-02-24T22:43:26+5:30
स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राजकारणावर बोलत नाही, सध्या राजकारणात कबड्डी सुरू आहे. एक दुसऱ्याचे पाय ओढायचं काम सुरू असतं पण आपण आपलं काम करत असतो इकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला)सन २०२३-२४,ठाणे या स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे,मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती
आपले खेळाडू सध्या मैदान देखील गाजवत आहेत आणि म्हणून आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचवण्यासाठी अशा स्पर्धांचा मोठा हातभार लागणार आहे आणि म्हणून राज्यातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील टॅलेंट, पोटेन्शिअल ला महत्व देणे महत्वाचं असल्याचे ही ते म्हणाले. अशा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या राज्याचे नाव लौकिक करू शकतात असेही ते म्हणाले. राज्य सरकारने 75 लाख रुपये या स्पर्धेसाठी दिलेत परंतु महापालिकेने एक कोटी अकरा लाख रुपये दिले याचा अभिमान आहे.
आपल्या राज्यातले खेळाडू खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत, टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये आणि म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची बक्षिसांची रक्कम देखील वाढवलेली आहे. तर यावेळी त्यांनी येथे सुरू असलेल्या स्पर्धेचं बक्षीस वाढवत पहिले बक्षीस 5 लाख, दुसरे 3 लाख आणि तिसरे बक्षीस 2 लाख त्यांनी जाहीर केले. हा देश आहे आणि मग तरुणाईला अशा प्रकारच्या खेळातून संधी श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगीतिले.