पुलंनी मध्यमवर्गाला संस्कारीत केले - ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:05 PM2019-01-14T16:05:56+5:302019-01-14T16:10:02+5:30
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत " पुल एक मर्यादा पुरुषोत्तम " या विषयावर अंबरीश मिश्र यांनी आपले मत व्यक्त केले.
ठाणे : दुसर्या महायुद्धानंतर घडलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नयनाने मध्यमवर्ग उदयाला आला. या मध्यमवर्गाचे पुलंनी ; (पु. ल. देशपांडे) मातेप्रमाणे सिंचन, संगोपन करुन त्यांच्यावर वैचारिक संस्कार केले. या संस्कारासाठी त्यांनी विनोदाचा आधार घेतला पण असे करताना पुलंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडविली नाही व तेजोभंगही केला नाही तर त्याला विलक्षण ममत्वाचे शिकविले, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी येथे व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत " पुल एक मर्यादा पुरुषोत्तम " या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना अंबरीश मिश्र बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेचे आयोजक आ. संजय केळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर, प्रसिद्ध सूत्रसंचालक नरेंद्र बेडेकर, पत्रकार संदीप आचार्य, सचिव शरद पुरोहित, सुहास जावडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दुसर्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या मध्यमवर्गाने नोकरी व्यवसायात जम बसविला. टिळक, फुले, गांधी, आंबेडकर, साने गुरुजी, काकासाहेब कालेलकर, सहस्त्रबुद्धे, माडखोलकर, रविकिरण मंडळ यांच्या विचारांचा या मध्यमवर्गावर परिणाम होता. यावेळी पोलिटिकल अनटचेबिलिटी नव्हती. गांधीवादी असूनही राष्ट्रवादी सावरकरांचा आदर करत, त्यांची भाषणे ऐकत. या मध्यमवर्गाला शिक्षणाची आस होती. त्याच्याकडे सुबत्ता, पैसे आले होते. तरीही शोषितांसाठी, पिढीतांसाठी त्याला काहीतरी करायचे होते. या मध्यमवर्गाचे प्रतिनिधी म्हणून पुलंनी या मध्यमवर्गाचे मातेप्रमाणे सिंचन, संगोपन केले. त्यांच्यावर वैचारिक संस्कार केले. आपल्यावर निबंधमालेचा परिणाम झाला आहे. यामुळे आगरकरांना छळणारा टिळकांचा वाद, वाक प्रहार, वाक तांडव याचीच आपल्याला सवय झाली आहे. लोकशाहीत, दुसर्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मनाची तयारी पाहिजे. आपला विचार मोजक्या पण सौम्य शब्दात सांगता यायला हवा. चर्चेवर, भाषणावर, शब्दांवर मतभेद असू शकतात पण ते जपून, सौम्यपणे वापरायचे असतात त्यासाठी पुलंनी विनोदाचा आधार घेतला. मतभेदाच्या या दगडातून; स्नेहाचे, गवताचे पान निघू शकते हे पुलंनी विसाव्या शतकातल्या कविंना सांगितले. "दाद" मोकळेपणाने कशी द्यायची हे पुलंनी महाराष्ट्राला शिकविले, असे विश्लेषण अंबरीश मिश्र यांनी केले. अत्र्यांच्या विनोदाचा बाज हा खेडवळ होता. तर पुलंचा विनोद महानगरीय संवेदना घेऊन आला. पण या विनोदात कोणाचा पायउतार करणे हा पुलं किंवा अत्र्यांचा उद्देश नव्हता तर समाजाचे भले व्हावे ही दृष्टी होती. पुलंनी आपल्याला खुप हसवल. आपण पुलंबरोबर आणि ते आपल्याबरोबर हसत होते. दोन माणसे खळाळून हसतात, ही क्रिया निरोगी, निरामय असायला हवी. पण आपण खुसपट शोधतो. त्याची जात, त्याचा धर्म अमुक अमुक म्हणून रागावलो आहे, हे कारण सांगतो आणि वर आपल्याला पुलंचा अभिमान वाटतो असही सांगतो पण आपण नेमके हे विसरतो की पुलं कधीही वय, जात, धर्म, सोशल स्टेट्स बघत नसत. यामुळेच शक्य असूनही नविन महागडी गाडी नसतेस घेता त्यांनी सेकंडहॅण्ड गाडी घेतली आणि बाबा आमटे, नारळीकर आदी समाजपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना पैसा वाटला. दुसर्या महायुद्धानंतर जगाची रचना जीवघेणी झाली. शस्रासस्पर्धेमुळे पाश्चिमात्य जगात माणसांना एकटेपण, दुभंगलेपण आले. पण आपल्याकडे ते आढळत नव्हते. टोकाचा व्यक्तिवाद तीव्र नव्हता. समाज एकवटला होता. समाजात मोठे स्थित्यंतरे होत असतात तेव्हा लेखक ते सावरतो आणि समाजात चिरंतन नैतिक मूल्य निर्माण करतो. पुलंनी या स्थित्यंतराच्या काळात आपल्याला एकोप्याने रहायला, समाजात सामंजस्य राखायला शिकविले. याचे कारण पुलंचा गाभा हा ज्ञानेश्वरांचा, तुकारामाचा, गालिबचा आहे, असे अंबरीश मिश्र म्हणाले. टिळकांचे युग संपता संपता गांधी युग सुरु झाले. बालगंधर्वांच युग संपता संपता अत्रे युग सुरु झाले.
संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर 1960 सालानंतर अत्रे युग संपून पुलं आणि लता मंगेशकर यांच युग सुरु झाल. याचा अर्थ मराठी मध्यमवर्गाने राजकारण थोडस बाजुला ठेऊन साहित्य, संस्कृती, कला यांना प्राधान्य दिले. पण गेल्या 20 ते 25 वर्षांत राजकारणाने डोके वर काढले. आपण साहित्यिक, सांस्कृतिक संचित विसरलो. त्यावेळी दुर्गाबाई, पुलं सारख्या साहित्यिकांना राजकारणी वचकून असत. कारण या साहित्यिकांना राज्यसभा, विधान परिषद, सरकारी समित्या यात रस नव्हता तर ते स्वान्ताह सुखाय होतो, ते स्वतःत रमायचे. 1935 पासून आजपर्यंत बंगालमध्ये साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण अजुनही आहे. आजही तेथे 20 -22 वर्षाची मुलेमुली टागोर, गंगोपध्याय, चटोपध्याय आदी साहित्यिकांचे सामूहिक वाचन करीत असतात. बंगाली भाषेच्या तुलनेत मराठी भाषेकडे पाहिले तर काय दिसते? शिकलेला मराठी माणूस कोरडा झाला आहे. कविता वगैरे काय? असा प्रश्न त्याला पडतो. मराठी भाषा ही त्याला गड्यांची भाषा वाटू लागली आहे. यामुळे आपल मराठी चांगले नाही आणि हिंदीही बेकार आहे. आपले मराठी पुढारी आपल्या मुलांना काॅन्वेंटमध्ये घालण्यात धन्यता मानतात.मग मराठीचे काय करायचे ? भाषा कोणतीही असो ती भावविश्वाची, भावजिवनाची लय आहे. जात धर्माच्या पलिकडे संस्कृती आहे. लोकजीवन संस्कृतीने वेढलेले आहे. संस्कृती जीवनप्रेरणा शिकविते. यासाठी भाषेची ओढ असायला हवी, असे सांगुन अंबरीश मिश्र यांनी आपल्या व्याखानाचे समारोप करताना म्हटले की, कृष्ण वृंदावनात, गोकुळात रमला नाही तो कदंबवृक्षाखाली बासरी वाजवत बसला. तसेच संगितात प्रचंड आवड असलेले पुलं आयुष्याच्या वृक्षाखाली गायनात रमले.