जायचे होते पुण्यात, आली ठाण्यात! एसटीत बसताना झाला घोळ : ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सुखरूप पोहोचली घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:04 AM2017-10-12T02:04:13+5:302017-10-12T02:10:00+5:30
अज्ञान आणि रुग्णालयाच्या नावातील साम्य या दोन गोष्टींमुळे एका महिलेला नाहक ठाणे ते पुणे असा प्रवास करावा लागला.
पंकज रोडेकर
ठाणे : अज्ञान आणि रुग्णालयाच्या नावातील साम्य या दोन गोष्टींमुळे एका महिलेला नाहक ठाणे ते पुणे असा प्रवास करावा लागला. ठाण्यात पोहोचल्यावर मूळ उत्तर भारतीय असलेल्या महिलेला नवीन शहर पाहून अक्षरश: रडू कोसळल्याने तिच्याभोवती घोळका जमा झाला.
सुदैवाने ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकातून जाताना तिला पाहिल्याने तिचा घरी जाण्याचा प्रवास फास्ट ट्रॅकवर आला. रेल्वे प्रबंधक आणि लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दुसºया दिवशी ती सुखरूप घरी पोहोचली.
सुनीता ईश्वरशरण मौर्या (३०) असे त्या महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील कुदळवाडी, इंद्रायणीफाटा येथे पती, ३ वर्षांच्या मुलासह राहते. पुण्यातील डी.वाय. पाटील रुग्णालयात मुलगा आजारी असल्याने औषध घेण्यास गुरुवार, ५ आॅक्टोबर रोजी ती निघाली. एसटीने पुण्यात जाण्यासाठी बसताना, ती चुकून ठाण्याच्या एसटीमध्ये बसली. ठाण्यात आल्यावर नवीन शहर पाहून ती गोंधळून गेली. याचदरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे ती प्रवेशद्वाराजवळ रडत असल्याने त्याच्या आजूबाजूला घोळका झाला. विचारपूस केली तरी ती काही बोलत नसल्याने गर्दीमध्ये भर पडत होती. दरम्यान, तेथून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी हा प्रकार पाहून तिस विचारणा केली.
तसेच रेल्वे प्रबंधक कार्यालयात नेऊन तिला घरी जाण्यासाठी मदत करण्यास सांगितले. घरी जाण्यासाठी तिला पैसेही दिले. रेल्वे प्रबंधक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना ही बाब सांगितली. त्यानुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि महिला पोलीस दीक्षा शरणागत यांनी त्यांचा विश्वास संपादन करून घराचा पत्ता विचारला. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर दोघींनी निगडी पोलिसांच्या मदतीने ६ आॅक्टोबर रोजी सुखरूप तिला घरच्यांच्या हवाली केले. सुनीता ही गृहिणी असून तिचा नवरा ईश्वरशरण हा नाका कामगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.