उसनवारीने घेतलेल्या पाच हजारांसाठी मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 08:21 PM2020-12-23T20:21:07+5:302020-12-23T20:23:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उसनवारीने घेतलेल्या अवघ्या पाच हजारांसाठी मित्राचाच खून करणाºया अनिल वाल्मिकी (२८) याला ठाणे जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उसनवारीने घेतलेल्या अवघ्या पाच हजारांसाठी मित्राचाच खून करणाºया अनिल वाल्मिकी (२८) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी बुधवारी जन्मठेपेची आणि पाच हजारांच्या दंडाची तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. खूनानंतर आरोपीने सुधीर सिंग (३३) या मित्राचा मृतदेह घरातच ठेवून बाहेरुन कुलूप लावून पलायन केले होते.
वर्तकनगरमधील शास्त्रीनगर भागातील रहिवाशी सुधीर हा ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घराबाहेर पडला. परंतू, तो दुसºया दिवशीही घरी परतला नव्हता. त्याच्या कामाच्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्याची पत्नी राणी सिंग (३४) यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १ आॅगस्ट २०१५ रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याच चौकशीसाठी २ आॅगस्ट रोजी पुन्हा ती पोलीस ठाण्यात गेली. त्यावेळी सुधीरचा मित्र अनिल वाल्मीकीही तिथे आला होता. वारंवार उधारीच्या पैशांची मागणी करुनही सुधीरने पाच हजार रुपये न दिल्याने त्याच्या डोक्यात सत्तूरने वार करुन त्याचा खून केल्याची कबूली त्याने त्यावेळी दिली. त्याआधी ३१ जुलै रोजी दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर अनिलने सुधीरला वर्तकनगर येथील इमारत क्रमांक ४३ मधील तळमजल्यावरील शिकाऊ उमेदवारांच्या वसतीगृहामधील एका खोलीमध्ये नेले. तिथेच या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अनिलने सुधीरच्या डोक्यावर सत्तूरने वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून अनिल स्वत:च्या घरी निघून गेला. अनिल यानेच दिलेल्या या माहितीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुर्गधी सुटलेल्या या घरातील स्वंयपाकगृहात सुधीरचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अनिल याला तात्काळ अटक केली. या संपूर्ण प्रकरणात दहा साक्षीदार तपासण्यात आले. सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल करुणा वाघमारे आदींनी न्यायालयात भक्कम पुरावे देऊन या खून प्रकरणाचा पाठपुरावा केला. तर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर बुधवारी याप्रकरणी आरोपी अनिल वाल्मिकी याला ठाणे न्यायालयाने १४ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली.