पूर्व वैमनस्यातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:22 PM2021-06-17T21:22:53+5:302021-06-17T21:31:40+5:30
मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मुळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करुन त्याचा खून करणाºया सोलापूरच्या गणेश गायकवाड (२३) याला गुरु वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मुळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करुन त्याचा खून करणाºया सोलापूरच्या गणेश गायकवाड (२३) याला गुरु वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावा ग्राहय धरुन न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा सुनावली आहे.
आरोपी गणेश हा मूळ सोलापूरचा असून आई- वडिलांच्या निधनानंतर तो तिथून नवी मुंबईत पळून आला होता. नवी मुंबईत तो कचरा वेचण्याचे काम करीत होता. मुळ नेपाळचा रहिवासी असलेला अनिल मात्र बेकार होता. दरम्यान, या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गणेशने अनिल याला नाष्टयासाठी समोसे देऊ केले. त्यावेळी त्याने रागाच्या भरात मी भिकारी आहे का? असे म्हणून गणेशला मारहाण केली होती. त्याचीच सल गणेशच्या मनात होती. त्याचा काटा काढण्याचा विचार करीत असतांनाच दीड वर्षांनी अनिल हा नवी मुंबई सेक्टर एक येथील एका उद्यानामध्ये २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारच्या सुमारास एकटाच झोपल्याचे गणेशच्या निदर्शनास आले. अनिल झोपेत असतानांच गणेशने त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत त्याला गंभीर जखमी केले. नंतर तिथून तो पसार झाला होता. दरम्यान, अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्यावर यातील कथित आरोपी गणेशला वाशी पोलिसांनी त्याच रात्री अटक केली. याच खटल्याची ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयात आरोपीने दिलेला हल्ल्याचा कबूली जबाब तसेच घटना घडण्यापूर्वी त्या उद्यानातील माळयाने त्यांना एकत्र पाहिले होते, असे सबळ परिस्थितीजन्य पुरावे सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी न्यायालयात सादर करुन आरोपीला शिक्षा देण्यासाठी युक्तीवाद केला. त्याच आधारावर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी केला आहे.