कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची ‘शिक्षा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:41 PM2020-06-11T23:41:12+5:302020-06-11T23:41:26+5:30
मालमत्ता कर, पाणीबील भरण्यासाठी नागरिक केडीएमसीच्या कार्यालयांमध्ये येत आहेत
डोंबिवली : अनलॉक १ मध्ये सरकारी कार्यालये नागरिकांच्या कामासाठी खुली झाली असली तरी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कर भरण्यासाठी त्यांना तासन्तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे. त्यात होणाºया गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात पाहायला मिळत आहे.
मालमत्ता कर, पाणीबील भरण्यासाठी नागरिक केडीएमसीच्या कार्यालयांमध्ये येत आहेत. परंतु, कार्यालयांमध्ये अद्यापही पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरी सुविधा केंद्रांत मालमत्ता कर, पाणीबील स्वीकारणे तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखले दिले जातात. ही सुविधा आॅनलाइनद्वारेही उपलब्ध आहे. परंतु, सर्व्हर वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना कर भरण्यासाठी कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.
केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील बरेचसे कर्मचारी कोविड १९ अंतर्गत वैद्यकीय विभागात कामासाठी घेतले आहेत. त्यामुळे तेथील धुरा केवळ दोन कर्मचाऱ्यांवर आहे. कर भरण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या वाढत असताना कर्मचाºयांच्या अभावामुळे त्यांना तासन्तास उभे राहावे लागत आहे. तसेच गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. कामाला विलंब होत असल्याने नागरिकांना दोन ते तीन दिवस कार्यालयात वारंवार यावे लागते. शनिवार व रविवारी हे केंद्र बंद असते. त्यामुळे सोमवारी गर्दी होते. कराचे वार्षिक उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्याप्रमाणे आर्थिक वर्षाच्या अखेरीस शनिवार आणि रविवारही केंद्र चालू ठेवली जातात. त्याप्रमाणे ती आताही चालू ठेवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विवाहनोंदणी बंद
केडीएमसी कार्यालयात केली जाणारी विवाहनोंदणी प्रक्रियाही लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे ठप्प झाली आहे. अजूनही ती सुरू झालेली नाही. त्यामुळे एप्रिल, मे व सध्या जूनमध्ये नवीन विवाह झालेले तसेच नोंदणी न झालेले दाम्पत्य विवाहनोंदणी कधी सुरू होईल, अशी विचारणा सातत्याने पालिकेकडे करत आहेत.