अवैध्य मद्यविक्री करणाऱ्या ३४ आरोपींवर दंडात्मक कारवाई; ८ लाख १० हजारांचा दंड वसुल
By अजित मांडके | Published: December 11, 2023 03:23 PM2023-12-11T15:23:34+5:302023-12-11T15:24:08+5:30
राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी लोक न्यायालयाने दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी साधारण २५ हजाराचा दंड ठोठावला आहे.
ठाणे : दुसऱ्या राज्यातील मद्य विक्रीस मज्जाव करण्यासाठी तसेच अवैध्य मद्यविक्री करण्यांना अद्दल घडावी या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयामार्फत अशांच्या विरोधात लोक न्यायालयात गुन्हे दाखल केले होते. यामधील ३३ गुन्ह्याचा नुकताच दोषसिध्दीचे (कन्वेक्शन) निकाल दिल्यानंतर ३४ आरोपींवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून आठ लाख १० हजारांचा दंड वसूल केला आहे.
ठाणे जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभाग भरीव कामगिरी करत असताना, विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये ३३ गुन्ह्यात न्यायालयाने दोषसिध्दी (कन्वेक्शन) निकाल देत ३४ आरोपींना दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.
राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी लोक न्यायालयाने दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी साधारण २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. जमा झालेल्या दंडाची रक्कम आठ लाख १० हजार असून, दोष सिद्धी उपक्रमातून जास्तीत जास्त गुन्हे निकाली काढण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्क विभागाचा आहे. महाराष्ट्रात दारूबंदी कायदा १९४९ कलम ६५ ई अंतर्गत लोक न्यायालयात गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे आरोपींना चांगलीच जरब बसत असून, शासनाच्या महसुलात वाढेल. अवैध मद्यविक्री, निर्मित, वाहतुकीला आळा बसण्यास मदत मिळणार आहे. डॉ. निलेश सांगडे (जिल्हा अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग ठाणे)