काल्हेर गावातील १.८६ कोटींच्या दरोड्यातील आरोपी पंजाब, तामिळनाडूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:20 AM2020-02-05T00:20:33+5:302020-02-05T00:20:39+5:30
सहा जणांच्या टोळीपैकी चौघांनी त्यांच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता.
ठाणे : भिवंडीतील काल्हेर गावातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे दरोडा टाकून एक कोटी ८६ लाख ३० हजारांचे दागिने लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील धर्मेश रणछोड वैष्णव (३८, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला सर्व सोन्याच्या दागिन्यांसह ऐरोलीतून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्याचे पाच साथीदार, पंजाब आणि तामिळनाडूत फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी दोन पथके नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
काल्हेर येथील व्यावसायिक जगदीश पाटील हे ३० जानेवारी रोजी मॉर्निंग वॉकसाठी पडले असता, सहा जणांच्या टोळीपैकी चौघांनी त्यांच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दरोड्यासह आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या नेतृत्वाखाली आठ पथकांकडून या दरोड्याचा तपास करण्यात येत होता.
तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे यामध्ये धर्मेश वैष्णव या दरोडेखोराचे नाव समोर आले. सलग तीन दिवस आणि तीन रात्र मेहनत घेऊन धर्मेशला एका बॅगेसह होनराव यांच्या पथकाने नवी मुंबईतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व म्हणजे चार किलो २१ ग्रॅम वजनाचे एक कोटी २६ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्याला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या आणखी पाच साथीदारांपैकी तिघे पंजाबमध्ये तर दोघे चेन्नईमध्ये पसार झाले असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. पलायन केलेल्या आरोपींनी दरोड्यातील रोकड नेल्याचेही धर्मेशने चौकशीत पोलिसांना सांगितले.
मध्यप्रदेशातील राजगडमध्येही दरोडा
धर्मेश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने मध्यप्रदेशातील राजगड येथे २०१५ मध्ये दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्येही त्याने सराफाच्या दुकानातील सोन्याचे दागिने लुटले होते. याच गुन्ह्णामध्ये त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने भिवंडीतील काल्हेरमध्ये काही साथीदारांच्या मदतीने पुन्हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.
तपास पथकांना ५० हजारांचे बक्षीस
पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि अनिल होनराव या दोघांच्या पथकांनी अत्यंत मेहनतीने या दरोड्याचा मोठ्या कौशल्याने तपास केल्याचे सांगत दोन्ही पथकांसाठी प्रत्येकी २५ हजारांचे असे ५० हजारांचे बक्षिस पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या वेळी जाहीर केले.