शहापूर तालुक्यात १४ कोटी ९० लाखांची भातखरेदी; मोठ्या संख्येने गाड्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:55 AM2021-01-28T00:55:50+5:302021-01-28T00:55:57+5:30
उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सात आधारभूत केंद्रे
भातसानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयामार्फत भात खरेदी करण्यात येत आहे. शहापूर तालुक्यात १४ कोटी ९० लाख ४३ हजार ४४०.७६ रुपयांची खरेदी झाली आहे.
तालुक्यामध्ये सात आधारभूत केंद्रे आहेत. आटगाव केंद्रामध्ये १२०७७. ९० क्विंटल म्हणजे दोन कोटी २५ लाख ६१ हजार ५१७. २० रुपये, किन्हवली केंद्रात १००८७.६० क्विंटल म्हणजेच १ कोटी ८८ लाख ४३ हजार ६३६.८० रुपये तर अघई केंद्रामध्ये ५५१२ क्विंटल म्हणजेच १ कोटी २९ लाख ६४ हजार १६ रुपये, वेहलोलो येथे ४५९३.९५ क्विंटल, खर्डीत १७०७२.४० क्विंटल, भातसानगर ९ हजार ९७७.५० क्विंटल, तर मुरबाड येथील धसई केंद्रात १२७३९.०७ क्विंटल भात खरेदी झाली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता आपला सातबारा दुसऱ्याला देऊ नका व आपलाच भात खरेदी केंद्रांवर आणावा, अशा प्रकारच्या सूचना उपप्रादेशिक व्यवस्थापक ए. व्ही. वसावे यांनी दिल्या आहेत. वसावे यांनी यावेळी शहापूर तालुक्यातील सर्वच केंद्रांवर भेटी देऊन शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली.
जिल्ह्यात ७९ हजार ७८९.३२ क्विंटलची खरेदी
जिल्ह्याचा विचार करता ७९ हजार ७८९.३२ क्विंटल इतका भात खरेदी करण्यात आला असून, याची किंमत १४ कोटी ९० लाख ४६ हजार ४४९.७६ रुपये आहे. या वर्षी अवकाळी पावसाने शहापूर तालुक्यातील जवळजवळ पूर्णपणे भातशेती पाण्याखाली गेली असतानाही इतक्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाल्याचे बाेलले जात आहे. ही भात खरेदी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे की अन्य राज्यातील, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. कारण सर्वच केंद्रांत आजही भाताच्या पोत्यांनी भरलेल्या गाड्या उभ्या असल्याचे चित्र आहे.