वृत्तपत्रविक्रेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
By admin | Published: May 13, 2017 12:42 AM2017-05-13T00:42:43+5:302017-05-13T00:42:43+5:30
येथील वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या वार्षिक वर्गणीदार योजनेंतर्गत निलेश कोलगे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या वार्षिक वर्गणीदार योजनेंतर्गत निलेश कोलगे या विक्रेत्याने नामांकित कंपनीची दुचाकी जिंकली. संपूर्ण ठाणे शहरातून अशा सुमारे ३६४ विक्रेत्यांना नुकतेच विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, वरिष्ठ महाव्यवस्थापक (वितरण) हारुण शेख यांच्या हस्ते या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ‘लोकमत’च्या विक्रेत्यांसाठी विविध स्तरांवर गेल्या एक वर्षापासून ही स्पर्धा सुरू होती. वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून भरघोस बक्षिसे मिळवण्याची संधी विक्रेत्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. येथील आनंद बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या समारंभात निलेश कोलगे (रा. लोकमान्यनगर) हे लकी ड्रॉचे मानकरी ठरले. एका नामांकित कंपनीची दुचाकी मिळवण्याचा मान त्यांना मिळाला. विशेष म्हणजे हमखास बक्षिसांमध्येही कोलगे यांनी आणखी चार बक्षिसे पटकावली.
या वेळी ठाणे जिल्हा वृत्तपत्रविक्रेता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशनचे सचिव दिलीप चिंचोळे, मुलुंड वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे राजू धावरे आदी या वेळी उपस्थित होते. वृत्तपत्रविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लोकमत’ने योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी सूचना अजित पाटील यांनी केली. या वाचक वर्गणीदार योजनेत सहभागी झाल्याबद्दल विक्रेत्यांचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही विक्रेत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी ग्वाही त्यांनी विक्रेत्यांच्या वतीने दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) सुबोध कांबळे यांनी केले. तर, जतीन पुरंदरे आणि कांचन माळवे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.