CoronaVirus News in Thane: वैद्यकीय साहित्य खरेदीत घोळ, मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटची चढ्या भावाने खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:56 AM2020-05-01T01:56:33+5:302020-05-01T01:56:51+5:30

कोरोना येण्यापूर्वीच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर तसेच इतर साहित्याची अवास्तव दरात खरेदी केल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे.

Purchases of medical supplies, masks, sanitizers, PPE kits at inflated prices | CoronaVirus News in Thane: वैद्यकीय साहित्य खरेदीत घोळ, मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटची चढ्या भावाने खरेदी

CoronaVirus News in Thane: वैद्यकीय साहित्य खरेदीत घोळ, मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटची चढ्या भावाने खरेदी

Next

अजित मांडके 
ठाणे : एकीकडे ठाण्यावर कोरोनाचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे याच काळात महापालिकेत आणखी एक घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना येण्यापूर्वीच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर तसेच इतर साहित्याची अवास्तव दरात खरेदी केल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे.
वास्तविक , कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर या वस्तुंचे दर कमी झाल्याने आधीच या वस्तुंची खरेदी का केली, असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढे अशा प्रकारचे प्रस्ताव परस्पर मंजुर करुनये, तसेच प्रशासकीय मान्यतेशिवाय कामे करु नये, असे परिपत्रक आयुक्तांनी यापार्श्वभूमीवर काढले आहे.
ठाणे महापालिकेत निविदा प्रक्रिया न राबवता कामे करुन घेण्याचे अनेक प्रकार या आधीही घडले आहेत. आधी हव्या त्या दरात काम करुन घ्यायचे, त्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करायचा, असा काहीसा प्रकार महापालिकेत मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. कोरोनाच्या संकटकाळातही असाच काहीसा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध वैद्यकीय साहित्य घेणे क्रमप्राप्त आहे. एखादी आपत्ती आल्यास अत्यावश्यक बाब म्हणून अशा प्रकारची साहित्य खरेदी करता येऊ शकते. मात्र अशी परिस्थिती ठाण्यात निर्माण होण्याआधीच या साहित्याची अवाजवी दरात खरेदी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वीच महापालिकेत काही अधिकाऱ्यांनी सॅनिटायझर, मास्क, पीपीई कीट, क्वारन्टाइन केंद्रामधील साहित्य आदींची खरेदी अवास्तव दराने केली होती. याच कालावधीत आयुक्त विजय सिघंल यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्यासमोर जादा दराने खरेदी केलेल्या साहित्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला होता. हे साहित्य कधी खरेदी केले गेले, याची मला माहिती नसल्याने त्यावर सही कशी करु ,असा सवाल करुन आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले.
>विभागप्रमुखांवर कारवाईचा इशारा
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास नेमकी सुरुवातच झाली होती, त्या काळात बहुतांश वैद्यकीय साहित्याचे दर जवळजवळ अर्ध्यावर आले होते. असे असताना या साहित्याची खरेदी प्रादुर्भावास सुरुवात होण्यापूर्वीच का केली गेली, असा आक्षेप ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदवला आहे. एखादी आपत्ती आली असेल तर तातडीची बाब म्हणून असे प्रस्ताव मंजुर केले जातात. परंतु तशी मंजुरीही न घेतल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे. ही परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आयुक्तांनी वैद्यकीय साहित्य खरेदीच्या या या प्रस्तावावर सही केली. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असा प्रकार आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिला आहे.
>कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यात असताना पालिकेने वैद्यकीय साहित्य खरेदी केले. याच कालावधीत आयुक्त म्हणून विजय सिंघल यांची नियुक्ती झाली आणि हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

 

Web Title: Purchases of medical supplies, masks, sanitizers, PPE kits at inflated prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.