गोदामांचे पूर्णा गाव अद्याप तणावाखाली
By admin | Published: October 28, 2016 03:35 AM2016-10-28T03:35:05+5:302016-10-28T03:35:05+5:30
तालुक्यातील गोदाम व इतर ठिकाणी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या पूर्णा गावातील रणजित ऊर्फ बंटी प्रदीप खंडागळे (२७) या तरुणावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.
भिवंडी : तालुक्यातील गोदाम व इतर ठिकाणी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या पूर्णा गावातील रणजित ऊर्फ बंटी प्रदीप खंडागळे (२७) या तरुणावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्याचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
पूर्णा गावातील शिव मंदिरात २४ आॅक्टोबरला दुपारी रणजित पूजेसाठी गेला असता देवळाच्या परिसरात दबा धरून बसलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना कळताच त्याच्या कुटुंबीयांनी रणजितला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, गुरुवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली. रणजितच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे आरोपींना पकडण्याची मागणी केली. अशाप्रकारे कोणावरही प्राणघातक हल्ला होणे, ही बाब चिंताजनक असल्याचे नागरिक सांगतात.
आरोपींचे कुटुंब गावाबाहेर
चार दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर गावातील आरोपींचे कुटुंबीयही घरे बंद करून गेली आहेत. गावात अशांततेचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.