पुरणपोळीला यंदा २५ टक्केच मागणी, घरगुती व्यवसायामुळे दुकानांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:31 AM2019-03-20T03:31:25+5:302019-03-20T03:31:43+5:30
होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशी आरोळी होळी पेटताच दिली जाते.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशी आरोळी होळी पेटताच दिली जाते. मात्र, नोकरदार महिलांना घरी पुरणपोळी बनवणे शक्य हात नसल्याने पोळीभाजी केंद्रांतून ती खरेदी केली जाते. घरगुती पुरणपोळीला जास्त पसंती दिली जात असून दरवर्षी एक ते सव्वा लाख पुरणपोळ्यांची शहरात विक्री होते. मात्र, यंदा २५ टक्केच मागणी आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पुरणपोळी तयार करणे हे खूप जिकरीचे काम असते. हा पदार्थ बनवणाऱ्या महिला कारागीरही मिळत नाहीत. हाताने बनविलेल्या पुरणपोळीलाच ग्राहकांची पसंती असते. दुकानांमध्ये काम करणाऱ्या काही महिला स्वत: आॅर्डर घेऊन पुरणपोळ्यांची विक्री करतात. त्यासाठी होळीच्या दिवशी अनेक जणी सुटीही घेतात. ही पुरणपोळी एक ते दोन रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने ग्राहकही ती खरेदी करतात, असे विक्रेता श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले.
डोंबिवलीतील काही सभागृह विविध संस्थांना चालविण्यासाठी कराराने दिली आहेत. त्या संस्थेला त्यासाठी भाडे द्यावे लागते. लग्नसराईसाठी काही विशेष कार्यालयांचेच बुकिंग केले जात असल्याने अशा संस्थांनीही आता पुरणपोळी विकण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका दुकान व्यावसायिकांच्या पुरणपोळी व्यवसायाला बसला आहे, असे पुरणपोळी विक्रेत्यांनी सांगितले.
दोन ते चार रुपयांची वाढ
गेल्या वर्षी पुरणपोळी २४ रुपयांना मिळत होती. मात्र, यंदा किमतीत दोन ते चार रुपयांनी वाढ झाल्याने ती २६ ते २८ रुपयांना मिळत आहे. गुळाची भाववाढ झाली आहे. तसेच महिला कामगार मिळत नसल्याने पुरणपोळीच्या किमतीत वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.