समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेण्यात पुष्पा भावेंचे योगदान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:58+5:302021-04-13T04:38:58+5:30

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या ...

Pushpa Bhave's contribution is important in taking the socialist movement to the cultural level | समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेण्यात पुष्पा भावेंचे योगदान महत्त्वाचे

समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेण्यात पुष्पा भावेंचे योगदान महत्त्वाचे

Next

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या सनातनी विचारांच्या साम्राज्याच्या प्रभावाला बाजूला करून प्रगतीशील विचारांना अवकाश मिळवून देणे, हे मोठ्या निर्भयतेचे आणि धडाडीचे काम आहे. पुष्पाताई भावे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ही निर्भयता आणि धडाडी नेहमीच प्रत्ययाला आली. ती नुसती शारीरिक नव्हे, तर त्यांच्या विचारांमध्ये, मांडणीमध्ये ती सतत दिसून आली. त्यांची कलात्मक सर्जनता ही नाट्यसमीक्षणे पुरती मर्यादित न राहता ती चिंतनशीलतेला भिडणारी होती आणि म्हणूनच खूप वरच्या दर्जाची होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि अनेक प्रगतीशील चळवळीचे उद्गाते बाबा आढाव यांनी केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आयोजित पुष्पा भावे स्मृती ग्रंथ, पुष्पा भावे : विचार व वारसा, याच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते.

आढाव पुढे म्हणाले, पुष्पाताई अकाली गेल्या, असे मला वाटते कारण त्यांच्या प्राध्यापक असण्याने त्यांना तरुण मुलांशी संवाद साधण्याची हातोटी होती. त्यांच्या विचारांचा प्रवाहीपणा, ठोसपणा आणि स्पष्टपणे, पण शांतपणे त्या करत असलेली विचारांची मांडणी तरुणांवर प्रभाव टाकणारी होती, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी होती. आजच्या वैचारिक गढूळतेच्या काळात अशा ठोस निर्भयतेने केलेल्या मांडणीची अतिशय आवश्यकता आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या जाण्याने जी वैचारिक निर्भयतेची पोकळी निर्माण झाली आहे, ती थोड्या प्रमाणात भरून निघेल, अशी आशा वाटते. महात्मा गांधी यांनी मांडलेला सत्याग्रहाचा विचार महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बांधून पुढे नेला. जोतिबा फुले यांच्या जयंतीच्यादिवशी पुष्पा भावे स्मृती ग्रंथाच्या निमित्ताने आपण संकल्प घेऊ की, शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर पुढे जाऊया. सत्यवादी लोकशाही संवाद तळागाळापर्यन्त निर्भयपणे पोहोचवूया, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Pushpa Bhave's contribution is important in taking the socialist movement to the cultural level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.