वाळू तस्करीतील ‘पुष्पा’; दिवसाढवळ्या बिनधास्त रेती उत्खनन, ठाण्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 01:48 PM2022-03-06T13:48:13+5:302022-03-06T13:48:24+5:30
ठाणे : जिल्ह्यात खासगी विकासकांकडून गृहसंकुलांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पण यासाठी लागणारी वाळू अवैधरीत्या उत्खननाद्वारे मिळत असल्याची चर्चा ...
ठाणे : जिल्ह्यात खासगी विकासकांकडून गृहसंकुलांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पण यासाठी लागणारी वाळू अवैधरीत्या उत्खननाद्वारे मिळत असल्याची चर्चा आहे. त्यास अनुसरून चौकशी केली असता वाळू तस्करीतील ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांवर गेल्या एक ते दीड वर्षात तब्बल २६ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये १३ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद केले आहेत.
जिल्ह्यातील या रेती भूमाफियांना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते बिनधास्त अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून विकासकांना रेतीपुरवठा करीत असल्याचे दिसून येत आहे. रेतीचे लिलाव सतत होत नसतानाही रेती मात्र बांधकामांना पुरवण्यात येत असल्याचे वास्तव आहे. याविरोधात तक्रारींचा भडिमार झाल्यास धडक कारवाईचा बडगा उगारून बहुतांशी गुन्हे निनावी दाखल केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. धडक कारवाईत मात्र विकासकासह रेतीमाफिया, भूमाफियांना ट्रक, रेतीसाठा, सक्शन पंप आदी नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यातील खाडी व नदी पात्रात रेतीचे जीवघेणे उत्खनन होऊन पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. रात्री, बेरात्री, काही ठिकाणी तर दिवसाढवळ्या बिनधास्त रेती उत्खनन केले जात आहे. पर्यावरणास घातक असलेल्या सक्शन पंपाद्वारे रेती उत्खननास कायदेशीर बंदी आहे. मात्र, आधीच अवैधरीत्या उत्खनन करीत असतानाही सक्शन पंपाचा वापर रेतीमाफिया करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
जप्त/नष्ट केलेली साधने-
सक्शन पंप- ४७
बार्ज - ३७
बोटी - १०
क्रेन - ०१
जप्त रेतीसाठा- २२१७ ब्रास,
नष्ट रेतीसाठा - २२९ ब्रास
.......
*७.३३ कोटींचे साहित्य केले नष्ट
जिल्ह्यातील खाडी व नदी पात्रात अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्या बोटींसह सक्शन पंप, ट्रक्स व क्रेन धाड टाकून जप्त केल्या. तब्बल सात कोटी ३३ लाख ७२ हजार रुपयांचे रेती माफियांचे नुकसान धाड टाकून केले आहे. यातील बहुतांशी वाहने, बोटी, सक्शन पंपाचे तुकडे करून ते नष्ट करण्यात आल्याचा दावा प्रशासनाचा आहे. जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे, कल्याण, शहापूर आदी ठिकाणच्या खाडीत व नदी पात्रात पोलिसांच्या साहाय्याने धाडी टाकून १३ गुन्हे नोंद केले आहेत.
.......
* रेतीमाफियांनी रेतीचे भाव वाढवले!
- जिल्ह्यातील खाडी व नदी पात्रातील रेतीच्या ठिकाणांचा वेळोवेळी लिलाव केला जात आहे. त्यानंतर रेती उपलब्ध होत आहे. पण बहुतांशी ठिकाणी रेतीमाफियांकडून अवैध रेती उत्खनन करून काळ्या बाजाराने रेतीची वाहतूक केली जात आहे. त्यास अनुसरून त्यांच्याकडून चढ्या दराने रेतीचा भाव घेतला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बांधकामांना मुबलक रेतीसाठा उपलब्ध होत आहे.
१- रेती माफिया ‘पुष्पा’वर वर्षभरात झालेली कारवाई
महिना - तालुका- कारवाई- गुन्हे दाखल
जानेवारी - ००-००-००
फेब्रुवारी- ठाणे - १ -००
मार्च - ठाणे- १-१-१
एप्रिल - भिवंडी/ठाणे- २ -१
मे - भिवंडी- २-००
जून - भिवंडी- १-१
जुलै - भिवंडी/ठाणे- २-२
ऑगस्ट -कल्याण/भिवंडी- २-२
सप्टेंबर - भिवंडी १-१
ऑक्टोबर - भिवंडी, ठाणे, कल्याण ८-३
नोव्हेंबर - कल्याण १-१
डिसेंबर - ठाणे, कल्याण ३-३
.........