अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या; वनविभागाकडून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 07:49 PM2022-10-29T19:49:54+5:302022-10-29T19:50:33+5:30
अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनामा केला
पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथ तालुक्यात एका अजगराची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल करत संशयितांची चौकशी सुरू केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात उसाटणे गाव आहे. या गावातील खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला आज सकाळी एक अजगर मारून टाकलेल्या अवस्थेत आढळला. तर दुसरीकडे याच अजगराला मारून इथे टाकल्यानंतरचे काही फोटो स्थानिक व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल झाले.
अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनामा केला. यानंतर अजगराची हत्या करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची चौकशी वनविभागाकडून केली जात आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वनअधिकारी विवेक नातू यांनी दिली आहे.