प्रश्नोत्तरांचा तास महासभेऐवजी चक्क आयुक्तांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:26 AM2018-10-21T03:26:50+5:302018-10-21T03:26:53+5:30
महासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये तो तास घेतल्याची धक्कादायक बाब शनिवारी झालेल्या महासभेत उघड झाली.
ठाणे : महासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये तो तास घेतल्याची धक्कादायक बाब शनिवारी झालेल्या महासभेत उघड झाली. महासभेच्या नियमांना केराची टोपली दाखवून आयुक्तांच्या दालनात तासभर घेतलेल्या या प्रश्नोत्तराच्या तासाचे व्हिडीओ चित्रीकरणही केल्याने नगरसेवक संतप्त झाले आहेत. मात्र, एवढ्या गंभीर प्रश्नाबाबत जाब विचारणे तर दूरच राहिले, सत्ताधारी शिवसेनेने मौन बाळगून प्रशासनापुढे शेपूट घातल्याचे महासभेत दिसले.
महापालिकेचे सदस्यजसे काय आरोपी आहेत, अशा पद्धतीने महासभेला अंधारात ठेवून त्यांची चौकशी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता आम्ही प्रश्न विचारायचे की नाही, असा सवाल करून प्रश्नोत्तरांचा तास घेण्याचा हा नवा पायंडा कोणत्या कायद्याच्या आधारे आयुक्तांनी पाडला, असे खडेबोलही त्यांनी सुनावले.
शनिवारी महासभा सुरू होताच, पवार यांनी या गंभीर मुद्याला हात घातला. त्यांच्या पक्षाच्या नगरसेविका आशा शेरबहादूर सिंग यांनी महासभेसाठी आस्थापना विभागाचे काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर त्यांना शुक्रवारी महापालिकेत बोलावले होते. परंतु, येताना एकट्यानेच यावे. आल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही केले जाईल, अशा आशयाचे पत्र दिले होते. त्यानुसार, त्या आणि इतर काही नगरसेवक ज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना क्रमाक्रमाने बोलावण्यात आले. परंतु, जे प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे सोडून इतर प्रश्नांचा आमच्यावर भडीमार केल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी उपस्थित केला. बंदिस्त खोलीत तासभर डांबून ठेवून आम्ही जसे काय आरोपीच आहोत, अशा पद्धतीने आमची शाळा घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे जी काही माहिती हवी आहे, ती माहिती अधिकारात विचारावी, असा अनाहूत सल्ला आयुक्त जर नगरसेवकांना देत असतील, तर हा घटनेने लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकारांचा अवमान नाही काय, असे अन्य एका नगरसेवकाने सांगितले.
जे प्रश्न महासभेत विचारले गेले आहेत, त्यांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना अशा पद्धतीने आयुक्तांसह त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी महापौरांचा अवमान करणे कितपत योग्य आहे, असा सवालही पवार यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांना बोलावून त्यांच्यासमोरच याची उत्तरे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली.
आयुक्त जयस्वाल महासभेत येताच सत्ताधारी शिवसेनेने भाजपाने आयुक्तांवर आरोप केले आहेत, याकडे लक्ष वेधले. शिवसेनेचे अनेक नगरसेवक, नगरसेविका आयुक्तांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. महापौरांनी हे प्रकरण गुंडाळून विषयपत्रिका सुरू करण्याचे आदेश दिले.
...तर सभागृह करमणुकीच्या कार्यक्रमांना द्यावे
आयुक्त हे हुकूमशहा आहेत. त्यांना प्रश्न विचारलेले आवडतच नाहीत. पालिकेतील चार ते पाच अधिकारी, काही नगरसेवक आणि ठेकेदार यांची अभद्र युती पालिकेत आहे. त्यातूनच हे सगळे घडत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका ही अधिकाºयांच्या ताब्यात देऊन महासभेचे सभागृह हे करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी देणे योग्य ठरणार आहे.
- उन्मेष बागवे,
मतदाता जागरण अभियान, प्रतिनिधी
विरोधकांनी
विपर्यास केला
सदस्यांचे बरेच प्रश्न होते. त्यात जुन्या प्रश्नांचाही समावेश होता. त्यानुसार, नगरसेवकांसमोर त्या विषयाच्या फायली ठेवून त्यातून हवी ती माहिती घ्या व काही अडचण असल्यास आम्हाला विचारा, असे सांगितले होते. परंतु, त्याचा विरोधकांनी विपर्यास केला आहे.
- संदीप माळवी,
उपायुक्त, ठामपा
>विधिमंडळाचे प्रश्नही मुख्य सचिवांच्या दालनात सोडवा
कायद्यात तरतूद नसताना अशा पद्धतीने बंद खोलीत व्हिडीओ चित्रीकरण करणे अयोग्य आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांकडे तक्रार करणार आहे. त्यातही अशा पद्धतीने अधिकारी जर दालनात बोलावून सभागृहातील प्रश्न सोडवणार असतील, तर विधानसभेत आमदारांनी विचारलेले प्रश्नही मुख्य सचिवांच्या दालनात सोडवावे.
- नारायण पवार, गटनेते, भाजपा