गुणी मुरबाडकरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक; अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या हस्ते गुणगौरव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 08:12 PM2018-07-01T20:12:15+5:302018-07-01T20:18:32+5:30
योगिनी पवार या तरुणीने कुस्तीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल व एमपीएससी परीक्षेत ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री आवार यांच्यासह दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. हा गौरव समारंभ मुरबाड येथे प्रियजन गुणगौरव समिती व प्रियजन महिला बचत गट समितीतर्फे आयोजित केला .
ठाणे / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील योगिनी पवार या तरुणीने कुस्तीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल व एमपीएससी परीक्षेत ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री आवार यांच्यासह दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. हा गौरव समारंभ मुरबाड येथे प्रियजन गुणगौरव समिती व प्रियजन महिला बचत गट समितीतर्फे आयोजित केला . यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचेदेखील वाटप करण्यात आले.
व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष व सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी आमदार गोटीराम पवार, प्रियजन महिला बचत गट समितीच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव आदी उपस्थित होते.
हा उपक्रम प्रोत्साहन देणारा असून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे मत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रियजन गुणगौरव समितीने हा गौरव समारंभ आयोजित केला होता. २८ ते २९ असे दोनदिवसीय मोफत महाआरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
कुस्तीगीर योगिनी पवार, एमपीएससी उत्तीर्ण भाग्यश्री आवार, इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या भाविका धुमाळ आणि बारावीत प्रथम आलेल्या सोयेब शेख आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. याशिवाय, खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३० जून रोजी न्हावे सासणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक्स, बॅग आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
...........