दहावीतील गुणच महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:04 AM2018-05-03T02:04:59+5:302018-05-03T02:04:59+5:30
पालक आणि पाल्य यांच्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे टप्पे येतात, त्यात दहावी आणि बारावीची परीक्षा हा एक मुख्य टप्पा असतो. त्यानंतर मात्र...
पालक आणि पाल्य यांच्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे टप्पे येतात, त्यात दहावी आणि बारावीची परीक्षा हा एक मुख्य टप्पा असतो. त्यानंतर मात्र, चिंता सतावते ती ‘दहावी-बारावीनंतर काय?’. पाल्याच्या भवितव्याबद्दल ठाम निर्णय घेण्याचा हा क्षण असतो. वस्तुत: पाल्याला दहावीत किती टक्के गुण मिळाले आहेत, यावर पुढचा मार्ग ठरतो. पूर्वी ७० टक्क्याहून अधिक गुण मिळाले की विज्ञान शाखेत किंवा तांत्रिक शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरवले जायचे. ५० ते ७० टक्के गुण मिळाले तर वाणिज्य शाखेत, आणि त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर कला शाखेत जायचे; आणि तेही नाही जमले तर अॅप्रेंटिसशिप वा आय.टी.आय.ला प्रवेश मिळतो काय ते पाहायचे, असा सरळधोपट मार्ग होता. पालक जास्त शिकलेले नसल्यामुळे मुलांनाच सर्व निर्णय घ्यावे लागत. ते कधी योग्य ठरत तर कधी अयोग्य.
हाच तेव्हाचा पाल्य आज पालक झाला आहे. त्याच्या विद्यार्थीदशेतील परिस्थिती आता राहिली नाही. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, ज्ञानशाखा विस्तारित झाल्या, ‘करिअर’ या शब्दाला वजन प्राप्त झाले, थोडीफार आर्थिक सुबत्ताही आली. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम पाल्याच्या पुढच्या करिअरच्या दिशेने कोणता योग्य निर्णय घ्यावा, इथपर्यंत येऊन थांबतो. एकाहून अधिक पर्याय समोर असल्यावर निर्णय घेताना तारांबळ उडते. पूर्वी पालकांच्या इशाºयावर चालणारा मुलगा अथवा मुलगी आज स्वत:चे निर्णय घेण्याइतपत सक्षम झाली आहे, पण योग्य करिअरची निवड करताना एकदा नाही, दोनदा नाही अनेकदा विचार करावा लागतो.
केवळ परीक्षेत अभ्यास करून किती गुण मिळाले, एवढे आता पुरेसे नाही. पाल्याची एकंदर कुवत, त्याची आवडनिवड, आपण त्याला कोणत्या शिक्षणासाठी अधिकाधिक मदत करू शकतो, त्याला देशांतर्गत शिक्षण देणार की, उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवणार, पुढच्या शिक्षणानंतर त्याला कोणत्या प्रकारची नोकरी मिळणार, तो आपल्याच देशात राहणार की परदेशात जाऊन नोकरी करणार, असे कितीतरी प्रश्न सुजाण पालकांसमोर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे पाल्याच्या करिअरच्या दृष्टीने काय निर्णय घ्यावा, ही त्यांच्यासाठी कसोटी ठरते.
एकदा करिअरची योग्य दिशा सापडली की पुढचा मार्ग सोपा होतो. म्हणून या टप्प्यावर थोडावेळ थांबून विचार करावा लागतो. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विचार करायला पालकांना सवडही मिळत नाही. कारण लागलीच पुढच्या प्रवेशासाठीचे सोपस्कार करायचे असतात. अलीकडे दहावी-बारावीची टक्के वारीने शंभरी गाठली आहे. नापास होणाºयांची संख्या नगण्य होत आहे. त्यामुळेही पालकांसमोर एक मोठी स्पर्धा उभी ठाकलेली असते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन व दिशादर्शन महत्त्वाचे ठरते.
‘करिअर’ या शब्दाची व्याख्याही व्यापक आहे. त्याचा थेट संबंध नोकरी-व्यवसायाशी येतो. आपण जे क्षेत्र निवडणार आहोत, त्यात आपल्याला आवड किती आहे आणि सवड किती आहे, हेदेखील पाहावे लागते. करिअरच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. मुलींनाही सर्व क्षेत्रे खुली आहेत. आता सैन्यदलात लढावू शाखेत आणि वैमानिकापर्यंत सर्वच स्तरावर मुलींनी आपले स्थान भक्कम केले आहे. त्याचाही करिअर निवडताना पालकांना विचार करावा लागतो.