कल्याण-शीळ रस्त्याची गुणवत्ता खासगी संस्थेकडून तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:31+5:302021-03-19T04:39:31+5:30
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे या कामाची गुणवत्ता खासगी ...
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे या कामाची गुणवत्ता खासगी संस्थेच्या माध्यमातून तपासून ती निकृष्ट दर्जाची आढळल्यास संबंधितांना त्याचे परिमाण भोगावे लागतील, असा सज्जड इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी संबंधितांना दिला.
या रस्त्याच्या कामाच्या पाहणीनंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत राज्य रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलीस आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी, मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हा संघटक हर्षद पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
हा रस्ता पूर्ण होईल याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या. परंतु, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. ज्या ठिकाणी तो सिमेंटचा तयार केला आहे, त्या ठिकाणी आताच तडे गेलेले आहेत. ज्या ठिकाणी जोड रस्ते त्याला येऊन मिळतात, त्या ठिकाणी कल्व्हर्टची कामे झालेली नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी एक बॉटल नेक तयार झाला आहे. पावसाळ्य़ात कल्व्हर्ट तयार न झाल्याने त्या ठिकाणी पाणी साचणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मागच्या आठवड्यात राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक विजय वाघमारे यांनी या रस्त्याच्या कामाविषयी महापालिकेच्या मुख्यालयात एक जम्बो बैठक घेतली. या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर रस्ते विकास कामातील अडथळे दूर करून काम येत्या पावसाळ्यापर्यंत मार्गी लावले जाईल, अशी माहिती दिली होती.
..............