मराठीतील दर्जेदार साहित्य निघाले लंडनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:00 AM2019-04-25T01:00:40+5:302019-04-25T06:44:32+5:30

‘ग्रंथ तुमच्या दारी’ : १५ ग्रंथपेट्या झाल्या रवाना; कुसुमाग्रज प्रतिष्ठान, इल्फर्ड मंडळाचा पुढाकार

The quality of Marathi literature came out in London | मराठीतील दर्जेदार साहित्य निघाले लंडनला

मराठीतील दर्जेदार साहित्य निघाले लंडनला

googlenewsNext

- जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : जगाच्या कानाकोपऱ्यांत मराठी माणूस वास्तव्याला आहे. देशापासून दूर राहत असले, तरी मातृभाषेविषयी त्यांची गोडी कायम आहे. मराठीतील नव्याजुन्या साहित्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता असते. अशा वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि इल्फर्ड मित्र मंडळाने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी मराठी साहित्याच्या १३ ग्रंथपेट्या मोठ्यांसाठी, तर बालसाहित्याच्या दोन पेट्या लंडनला रवाना झाल्या.

जगभरात वाचनाचा प्रचार आणि प्रसार करत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानद्वारे जगातील कानाकोपऱ्यांत मराठी साहित्याचे मंथन होत असलेल्या या उपक्रमात सध्या तब्बल दोन कोटींची ग्रंथसंपदा असलेल्या १६६१ ग्रंथपेट्या आहेत. आता १५ ग्रंथपेट्या इल्फर्ड मित्र मंडळाच्या सागर डुगरेकर यांच्या पुढाकाराने लंडनमध्ये रवाना झाल्या आहेत. या गं्रथपेट्यांमध्ये दर्जेदार विविध विषयांवरील २५ पुस्तकांची एक पेटी आहे, ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके आहेत. साहित्याचे, लेखनशैलीचे जास्तीतजास्त प्रकार जसे कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, चरित्र, प्रवासवर्णन अशा साहित्याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत एका वाचक कुटुंबाक डे ग्रंथपेटी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे.



प्रत्येक ग्रंथपेटीतील पुस्तके वेगवेगळी असणार आहेत. दर तीन महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथपेटी इतर गटांसोबत बदलली जाते. जगभरात जिथे म्हणून मराठी शब्द, मराठी भाषा आहे, मराठी माणूस आहे, तिथे आमची योजना जावी, असा आमचा प्रयत्न आहे. एका छोट्याशा कल्पनेला जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्याचाच एक भाग म्हणून तब्बल १५ ग्रंथपेट्या लंडनला रवाना झाल्या आहेत. लवकरच इतर काही देशांतही या पेट्या पाठवणार आहोत, असे ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे समन्वयक विनायक रानडे यांनी सांगितले.



योजनेंतर्गत वाचनालयाच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकखरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी द्यावी, असे आवाहन केले जाते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवस, एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगांनुरूप ग्रंथसंपदा मिळत गेली. या गं्रथसंपदेला भारतात ८० जीअंतर्गत आयकरात सूट देण्यात आली आहे. या योजनेमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात, कार्यालयात, दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी ग्रंथसंपदा विनामोबदला विनासायास उपलब्ध करून दिल्या जातात.

या ठिकाणीही पोहोचणार योजना : ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक येथे, तर भारताबाहेर दुबई, नेदरलॅण्ड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, ओमान, मॉरिशस, सिंगापूर, लंडन, इत्यादी ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे.

Web Title: The quality of Marathi literature came out in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.