अभियंत्यांच्या रिक्त जागांकडे कानाडोळा, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा दर्जा घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:14 AM2021-02-01T01:14:17+5:302021-02-01T01:15:03+5:30
TMC News : ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे.
ठाणे - ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब वारंवार लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊनही ते मूग गिळून गप्प बसले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, गटारे, शाळा, समाजमंदिरे, रस्ते, पाणीपुरवठ्यांची कामे आदी बांधकामांवर ठाणे जिल्हा परिषद वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. लोकहिताच्या या सार्वजनिक बांधकामांचा दर्जा सध्या ठेकेदारांच्या भरवशावर आहे. कारण या कामाचा दर्जा तपासण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शाखा अभियंतेच नाहीत. जिल्हा परिषद मुख्यालयातील बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांची जागा तब्बल दोन वर्षांपासून रिक्त आहे. चारपेक्षा अधिक कनिष्ठ अभियंत्यांची गरज बांधकाम विभागाला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा गाडा सध्या मोजकेच अभियंते ओढत आहेत.
पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे विभागालाही अभियंत्यांची गरज आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सहापेक्षा अधिक अभियंत्यांची गरज आहे. या पाणीपुरवठा विभागाचे भिवंडी, शहापूर आणि अंबरनाथ तीन उपविभाग आहेत. उपविभागाच्या कामाची जबाबदारी वर्दीच्या स्वरूपात पार पाडली जात आहे.
अंबरनाथ उपविभागावर दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या मुरबाड तालुक्याची जबाबदारी आहे. मुरबाड तालुक्याचा एक स्वतंत्र उपविभाग तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी काही वर्षांपूर्वी शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता. या नव्या उपविभागालाही सहा अभियंत्यांची आवश्यकता
भासणार आहे.
सध्या उपलब्ध अभियंत्यांना जादा कामाची जबाबदारी देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यामुळे कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने निदर्शनास आणले.